पुस्तक परिचय: डियर तुकोबा
मराठी भाषेला पडलेले सुंदर, कोमल अन् तितकच कणखर आणि बंडखोर स्वप्न म्हणजे तुकोबाराय. तुकोबांनी मराठी भाषेला दिलेली जी शब्द संपत्ती आहे ती अतुलनीय अशी आहे. मानवी स्वभावातील आणि जगण्यातील प्रत्येक भाव हा तुकोबांच्या साहित्यात ओतप्रोत भरलेला आहे. तुकोबांनी गाथेमध्ये जे अभंग लिहिलेले आहेत ते अभंग म्हणजे त्यांना आलेले अनुभव आहेत आणि ते अनुभव ते ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत ही मराठी भाषेला एका सर्वोच्च शिखरावर घेऊन जाते, मराठी भाषेवर तुकोबांचे जे काही अनंत उपकार आहेत ते हेच आहेत. आणि त्याचमुळे लिहिणाऱ्या प्रत्येक हाताने सर्वात अगोदर तुकोबांना वाचून काढणे आवश्यक आहे, नव्हे नव्हे त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या भाषेतील रसाळपणा, गोडवा आणि त्याच वेळी अन्यायाच्या छाताडावर बसून त्याचं थोबाड हाणणारी त्यांची कणखर भाषा ही समजून घ्यायला हवी. “भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ||” आम्ही मेणाहूणी मऊ आहोत हे खरं आहे पण कठीण अशा वज्रासही आम्ही भेदू एवढी आमच्यात धमक आहे. प्रेम केलं तर आम्ही आमचं सर्वस्व देऊन टाकू पण आमच्या जगण्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत