जीवाची मुंबई....

(फोटो जरी जुना असला तरी अनुभव मात्र नवा आहे..)


जीवाची मुंबई


मुंबई…. सतत काही ना काही कारणांनी खुणावणारं शहर..  पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहर माझ्या कमालीची आवडती आहेत. त्याची अनेक कारणं आहेत. दोन्ही शहरांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. पुणे तस बऱ्या पैकी शांत शहर आहे आणि त्या उलट मुंबई.. इथे कधी रात्रच होत नाही. सतत माणसांची वर्दळ असते, ये जा सुरू असते.. मुंबई झोपत नाही हे खरं आहे पण ती अनेकांची स्वप्न पूर्ण करते हे ही खर आहे.

दी.१६/१२/२०२२ रोजी मुंबईला जाणं झालं. पुण्याइतक्या नसल्या तरी मुंबईच्या ही गोड अशा रम्य आठवणी आहेत. मुंबईचे माहीत नसलेले काही रस्ते आज ही आठवणीत आहेत. त्यांची नावे माहीत नाही, पुन्हा होऊन तिथे जायचं कसं हे ही आठवणार नाही आणि समजणार ही नाही. पण त्या रस्त्यांनी दिलेली आठवणींची शिदोरी मात्र कायम लक्षात राहणारी आहे. काहीं चांगले, काही वाईट आणि काही रोमँटिक अनुभव त्या रस्त्यांनी मला दिले. काळ सरतो, वेळ सरते पण गतकाळातील या आठवणी मात्र कायम सोबत राहतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा सांगितल्या आहेत. मला त्यात आठवणींना ही ऍड करुशी वाटतं. कारण वरील तिन्ही गरजा जर मानवाच्या पूर्ण झाल्या तर त्यांना आनंद हवा असतो. काहींना सगळं मिळालं तरी ती दुःखी असतात. कारण त्यांच्याकडे आठवणी नसतात. या आठवणी निर्माण होतात त्या आपल्या माणसांमुळे.. आणि त्या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो. तर हे सगळं मला मुंबई देऊन जाते..

फिल्मबाज फिल्म कंपनीच्या एका इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. एकट्याने मुंबईला कधी या आधी गेलो नव्हतो. त्यामुळे जरा धांदलच उडाली. चाकण मध्ये बराच उशीर झाला. कशीबशी एक बस मिळाली. ती फारच हळू चालत होती. तळेगाव दाभाडे इथे उतरलो आणि एका रिक्षाने एक्सप्रेस वे वरील तळेगावच्या टोलनाक्यावर आलो. मग तिथून एक बस पकडली आणि थेट साकीनाका (गमतीदार नाव आहे) इथे उतरलो आणि तिथून मेट्रोने अंधेरीला गेलो. अंधेरीला उतरल्या नंतर पुन्हा रिक्षाने पार्ल्याच्या केशवराव घैसास ऑडिटोरियम इथे पोहोचलो.. तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. तसा वेळेत पोहचलो होतो पण धावळप जी व्हायची ती झाली. 

तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत ज्या मुलांना निमंत्रित केलं होतं त्यांच्याशी गाठ भेट झाली. गेले दोन तीन दिवस आम्ही फक्त फोन वर बोलत होतो. तिथे प्रत्यक्ष भेटून छान वाटलं. नवीन ओळखी अशाच वाढत असतात. 

कार्यक्रम झाला.एक छोटीशी ट्रॉफी घेऊन आम्ही माघारी फिरलो. उशीर खूप झालेला, म्हणून मामा कडे राहायचा निर्णय मी घेतला होता. एक जण मुंबईचा असल्याने बर झालं. कुठून कस जायचं याचं आयतं मार्गदर्शन मिळत होतं. तो सांगत होता आणि आम्ही तिघे त्याच्या मागे चालत होतो.मग एकाला अंधेरीला सोडलं, एकाला दादरला सोडलं आणि मला कुर्ल्याला.. असे आम्ही चौघेही एकमेकांचा निरोप घेऊन विभक्त झालो. आता मला कुर्ल्यावरून खारघरला जायचं होतं. त्या मुंबईच्या मुलाने लोकल कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल हे आधीच सांगितले होते. मी तसा गेलो. त्यानंतर तिकीट कुठे मिळेल याची चौकशी करू लागलो. या सगळ्यात साडे बारा वाजून गेले होते. आणि मामाचे फोन सुरू होते. मी तिकीट घर शोधले. घाईतच तिकीट घेतलं आणि पळत प्लॅटफॉर्मवर निघालो. पोहचलो पण लोकल आली नव्हती. पंधरा मिनिटं वेळ होता असं समजलं. मग जाणवलं की आपल्याला भूक लागली आहे आणि आपण काहीच खाल्लं नाही. मग शेजारच्या स्टोल वरून एक मस्त थंडगार वडापाव घेतला. लोकल यायच्या भीतीने भरभर खाल्ला. आणि लोकल आलीच. थांबली मी बसणार इतक्यात अनाउन्समेंट झाली.. "शुभम सोनवणे जिथे कुठे असतील त्यांनी तिकीट काउंटरवर येऊन आपली ट्रॉफी घेऊन जावी.." 

माझं नाव ऐकताच मी गोंधळून गेलो होतो. मला काही सुचेनाच. भानावर येत पाहिलं आणि लक्षात आलं की आपली ट्रॉफी आपल्याकडे नाहीये. पुन्हा पळत तिकीट घर… मला पळत येताना पाहून तिकीट देणारा  आणि त्याच्या मागे उभा असलेला माणूस असे दोघेही हसत होते. त्यातील एकाने लांबूनच हळू येण्याची सूचना केली. त्यांच्या हसण्यात मला कौतुक दिसत होतं. धापा टाकत मी पोहचलो.. आणि म्हणालो,

"माझी ट्रॉफी विसरली होती.." 

तिकीट कुठूच काढलं आहे अस विचारून ती ट्रॉफी माझीच आहे का याची त्यांनी खात्री करून घेतली. आणि ट्रॉफी मला दिली. जाता जाता त्यातील एक जण म्हणाला, " राईटर हो.." 

मी म्हणलो, " हो.." एक वेगळाच आनंद जाणवला. 

त्यानंतर त्यांनी माझं अभिनंदन केलं. मुंबईचा उकाडा आणि माझी पळापळ यामुळे मी पूर्णपणे घामाने ओथंबून गेलेलो होतो. काळजाची धडधड स्पष्टपणे जाणवत होती. अशा या वातावरणात त्या दोघांनी केलेलं कौतुक एक वेगळाच गारवा देऊन गेलं.  त्यांचे आभार मानत मी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आलो. थोडया वेळात लोकल आली आणि मी तीत बसलो. ट्रॉफी कडे काही काळ पाहिलं. आणि मनात विचार आला. एवढी धावपळ या छोट्याशा ट्रॉफीसाठी मी केली. तेवढीच जर स्वतःच्या हातून सुटणाऱ्या स्वप्नांसाठी केली असती तर किती बर झालं असतं. माणसाला कायम त्याच्या हातून परिस्थिती सुटून गेल्यावरच शहाणपण सुचत असं मला वाटतं. लोकलच्या खिडकीतून पळणारी मुंबई रात्रीची सुद्धा चमकदार दिसत होती. त्या मुंबईकडे पाहतच मी माझ्या ट्रॉफीचा स्नॅप काढला आणि पाठवून दिला. काळजाची धडधड आता कमी झाली होती.

खारघर स्टेशनवर मी पोहोचण्याआधीच मामा येऊन थांबला होता. मग त्यांना का उशीर झाला आहे हे सांगितले. घरी आल्यावर भूक नव्हती पण मामाने आग्रह केल्यामुळे थोडस खाल्लं. आणि थोड्याश्या गप्पा मारून झोपलो. दुसऱ्या दिवशी (१७/१२/२०२२) मामा आजच्या दिवस राहा असं म्हणत होता पण मला क्लास आणि अशीच वेगवेगळी कारणं होती म्हणून म्हणलो, नको… पुन्हा केव्हातरी राहिल.

असं म्हणून जेवण वैगेरे करून मी पुण्याला निघालो.

मग खारघर वरून बाणेर, मग बाणेर वरून बसने डांगे चौक, डांगे चौकातून मनपा आणि मग मनपापासून उभं राहून शिक्रापूर.. प्रचंड धावपळ.. तरी घरी यायला सात वाजून गेले होते. थकवा जाणवत असल्याने आलो…, जेवलो आणि झोपलो… 

ही सगळी धावपळ, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा हे जरी असलं तरी याचा त्रास होत नव्हता. मला असं वाटत माणूस त्याच्या आवडीचं आणि त्याने स्वतःने निवडलेलं असं काही करत असला की, त्याचा त्याला त्रास होत नाही. मला ही माझ्या बाबतीत असंच वाटतं. 

आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. त्याने आपण आधीच दुःखी असतो. अशा वेळी अशी पायपीट आणि धावपळ झाली की बर वाटत. आजूबाजूला एवढ्या प्रकारची माणसं भेटून जातात की त्यांची गणतीच लागत नाही. अनेक स्वभाव, त्याच्या आड दडलेले अनेक भाव, अनेक प्रकारची दुःख, नव्या आशा, आकांक्षा आणि अनेक प्रकारची सुखं ही… एवढं सगळं फक्त रस्त्यावर नुसतं फिरलं तरी दिसत राहतं, जाणवत राहतं. 


कुठल्या तरी प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी शहरं च्या शहरं पालथी घालण्यापेक्षा त्या शहरांचे रस्ते पालथे घातल्याने आपण अधिक समृद्ध होतं असतो असं मला वाटतं. पण हे तेव्हाच समजू शकतं जेव्हा आपण रस्त्यावर येऊ… मुंबईने ती संधी दिली हे भाग्यचं म्हणावे लागेल…..


#सत्यशामबंधू #_shubhra_


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा