संत चमत्कार : माझा दृष्टिकोन


रंग चैतन्याचा... रंग वारीचा...

विषय :- संत चमत्कार....

आज हा विषय निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. आषाढ वारीचा सोहळा आता पुण्यनगरी सोडून पंढरीच्या दिशेने पुढे सरकला आहे. वारकऱ्यांचा उत्साह  हा बरसणाऱ्या पावसाप्रमाणे वाढतच चालला आहे.
वारीच्या पर्वात आमच्याही अनेकांबरोबर वारीविषयी सतत चर्चा झडत असतात. असाच एकदा विषय निघाला की संतांनी केलेले किंवा त्यांच्या नावावर काळाचा परिणाम म्हणून आरूढ झालेले चमत्कार आजच्या विज्ञान युगात खरे मानायचे की नाही.  मुळात संतांच्या या चमत्काराविषयी कुठेही ठोस पुरावा नाही. संतांचे जे चरित्रकार होते त्यांनी जे लिहून ठेवलं तेच आज खरं मानलं जातं आहे.

मी स्वतः चांगलं किंवा वाईट असा भेदाभेद करत नाही. या जगात काहीच चांगलं किंवा वाईट नसत अस माझं ठाम मत आहे. आपला एखादा जवान जेव्हा पाकिस्तान कडून झालेल्या हल्ल्यात शहीद होतो तेव्हा ती आपल्या साठी वाईट तर पाकिस्तान साठी चागली गोष्ट असते. हेच उलटही होऊ शकत. भारतीय संस्कृती आणि स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या संपूर्ण विश्वाला कुटुंब मानतात. मग जर अस असेल तर वर नमूद केलेली घटना आपण कुठल्या आधारावर चागली किंवा वाईट ठरवणार आहोत.
जर देव सर्वसत्ताधीश मनाला तर जे काही घडत ते सर्व त्याच्या मर्जीने होतं असत. मग आपसूकच चांगलं आणि वाईट ( लोकांच्या म्हणण्यानुसार) हे दोन्ही देवांच्या मर्जीने घडतं असच म्हणावं लागेल.

परंतु हाच मुद्दा जेव्हा मी मांडतो तेव्हा असही म्हंटल जात की, या जगात जशी चागली शक्ती ( देव) अस्तित्वात आहे तशीच वाईट शक्तीही ( दानव ) अस्तित्वात आहे. असा प्रतिवाद करून आपलं 'आपण ज्याला चांगलं म्हणतो ते सर्व देव करतो आणि जे वाईट होत ते सर्व दानव करतो' अस म्हणणं असत. हे बरोबर की चूक यात मी कधी पडत नाही. मी माझ्या परीने या गोष्टीला महत्त्व देत नाही.

आजही महाराष्ट्रातील संतांच्या नावावर अनेक चमत्कार जोडले गेलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा विचात केला तर, त्यांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले, निर्जीव भिंत चालवली असे अनेक चमत्कार आढळून येतील. संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत त्यांनी इंद्रायणीत बुडवलेले गाथाचे अभंग बाहेर काढले अस सांगितलं जातं. संत नामदेव महाराज याच्याशी देव बोलायचा तर संत जनाबाई यांच्या घरी देव दळण दळायचा, संत गोरा कुंभार यांच्या मेलेल्या मुलाला देवाने जिवंत केले असे अनेक चमत्कार सांगता येतील.

आता प्रश्न उरतो तो असा की, आपण संतांकडे नक्की कुठल्या नजरेने पाहतो..? हा...
आजही संत ज्ञानेश्वर महाराज यांच नाव घेतलं की ,की आपल्याला त्यांचा रेडा आठवतो पण त्यांनी लिहलेली ज्ञानेश्वरी आठवत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे. आजही लाखो लोक आळंदीत जाऊन समाधीचं दर्शन घेतात पण ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितलेला मार्ग अवलंबत नाही.
संतांचे चमत्कार हे संतांच्या ऐकून सामाजिक कार्यापेक्षा वरचढ झालेले आहेत. संतांना देवत्व बहाल करून आपण त्यांचं सामाजिक उत्थानाचं कार्य नजरेआड करतो आहोत. संतांनी मांडलेला दृष्टिकोन हा जरी अध्यात्म वृत्तीचा असला तरी त्यात  अंधश्रद्धेला थारा नव्हता.
संत तुकाराम महाराज म्हणतात,

" नवसे पोरे होती तर। का करणे लागे पती ।।

तुकाराम महाराजांनी लगावलेली ही चपराक आजही 21 व्या शतकात जशी च्या तशी लागू पडते.
ही आजच्या विज्ञानयुगाची हार आहे. जर 350 वर्षा पूर्वी तुकोबारायांनी सांगितलेली गोष्ट आजही आपल्याला सांगावी लागत असेल तर नक्की संतांकडून आपण काय शिकलो हा प्रश्नच आहे. संतांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टिकोन दिला का..? या बाबत मतमतांतरे असू शकतात, परंतु संतांनी समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त केलं हे आपल्याला मान्य करावेच लागेल. संतांचं हेच मोठेपण आपण त्यांनी केलेल्या ( न केलेल्याच) चमत्कारापुढे विसरून गेलेलो आहोत.

मुळात भारतीय समाज हा देवभोळा समाज असल्यामुळे कुठल्याही चमत्कारिक गोष्टीला आपण लगेच खरं मानून बसतो. दूध पिणारा गणपती म्हंटल की हजारो लाखो लोकांची झालेली गर्दी आपण पाहीली आहे. यात अडाणी कमी आणि शिकलेली माणसे जास्त असतात हे आणखीन एक दुर्दैव.

संत लक्षात राहावेत हे त्यांच्या साहित्यासाठी... त्यांनी दाखवलेल्या पुरोगामी विचारांसाठी...त्यांनी केलेल्या बंडखोरी साठी.... त्यांनी मांडलेल्या अहिंसक मार्गासाठी.... त्यांनी दाखवलेल्या विश्वात्मक देवासाठी.... पण आज अस होताना दिसत नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय.

सर्व गोष्टी देवावर ढकलून द्यायच्या असतील तर ,
"मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।" अस संतांना म्हणावच लागलं नसतं. संतांचे चमत्कार हे माझ्या साठी गौण आहेत , मला संतांनी दाखवलेला मार्ग जास्त प्रिय आहे.

रेड्या मुखी वेद बोलवणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा, "जे खलांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्म रती वाढो ।
भुता परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।" अस म्हणणाने आणि जगाला शांततेचा संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज मला जास्त प्रिय आहेत.

इंद्रायणीतुन गाथा वर काढणारे किंवा सदेह वैकुंठाला जाणाऱ्या तुकोबांपेक्षा मला " जे का रंजले-गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथें चि जाणावा ।।" अस म्हणणारे तुकोबाराय जास्त प्रिय आहेत.

"कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।।" अस म्हणून कर्माला महत्त्व देणारे सावता महाराज मला जास्त प्रिय आहे.

अशी अनेक संत वचन सांगता येतील. परंतु आपण आज संतांची ही खरी शिकवण विसरून त्यांना फक्त चमत्कारांसाठी आठवत आहे. हे समस्त महाराष्ट्रच दुर्भाग्यच म्हणावं लागेल. 

जाता जाता समाजाच्या ह्याच अंध भक्तीवर शब्दांचा बडीमार करणारा नाथबाबांचा एक अभंग खास आपल्या सर्वांसाठी.....

देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चाकरिती पाही ॥१॥
नैवेद्य वहाती नारळ । अवघा करिती गोंधळ ॥२॥
बळेंचि मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥
बळेंचि आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ॥४॥
सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ॥५॥
एका जनार्दनीं ऐसा देव । येथें कैसा आमुचा भाव ॥६॥

शब्दसीमा....

#सत्यशामबंधू


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा