पुस्तक परिचय: डियर तुकोबा
मराठी भाषेला पडलेले सुंदर, कोमल अन् तितकच कणखर आणि बंडखोर स्वप्न म्हणजे तुकोबाराय.
तुकोबांनी मराठी भाषेला दिलेली जी शब्द संपत्ती आहे ती अतुलनीय अशी आहे. मानवी स्वभावातील आणि जगण्यातील प्रत्येक भाव हा तुकोबांच्या साहित्यात ओतप्रोत भरलेला आहे.
तुकोबांनी गाथेमध्ये जे अभंग लिहिलेले आहेत ते अभंग म्हणजे त्यांना आलेले अनुभव आहेत आणि ते अनुभव ते ज्या पद्धतीने मांडतात ती पद्धत ही मराठी भाषेला एका सर्वोच्च शिखरावर घेऊन जाते, मराठी भाषेवर तुकोबांचे जे काही अनंत उपकार आहेत ते हेच आहेत.
आणि त्याचमुळे लिहिणाऱ्या प्रत्येक हाताने सर्वात अगोदर तुकोबांना वाचून काढणे आवश्यक आहे, नव्हे नव्हे त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या भाषेतील रसाळपणा, गोडवा आणि त्याच वेळी अन्यायाच्या छाताडावर बसून त्याचं थोबाड हाणणारी त्यांची कणखर भाषा ही समजून घ्यायला हवी.
“भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ||”
आम्ही मेणाहूणी मऊ आहोत हे खरं आहे पण कठीण अशा वज्रासही आम्ही भेदू एवढी आमच्यात धमक आहे. प्रेम केलं तर आम्ही आमचं सर्वस्व देऊन टाकू पण आमच्या जगण्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं टाळकही फोडून टाकू शकतो एवढी ताकद आमच्या मनगटात आहे असं तुकोबाराय म्हणतात. एकूण काय तर असा तुकोबांचा स्वभाव होता.. ते पांडुरंगा प्रति भोळे आहेत, प्रेमाप्रती भोळे आहेत पण समाज उत्थानाच्या कार्यामध्ये ते बंडखोर आहेत.
तुकोबांच्या याच स्वभावाची आजच्या मराठी वाचकाला समजेल, उमजेल आणि कळेल अशी ओळख करून देण्याचं काम पत्रकार लेखक विनायक होगाडे हे त्यांच्या अत्यंत लोकप्रिय अशा “डियर तुकोबा” या पुस्तकात करतात.
डियर तुकोबा हे नावच इतकं कॅची आहे की ते पुस्तक विकत घेण्याचा आणि वाचून काढण्याचा मोह मला काही आवरला नाही. पण मला या पुस्तकावर स्वतःच मत प्रदर्शित करण्याला मात्र एक वर्षे लागले. (आता त्याची अनेक कारण आहेत, पण ती कारण मी इथे सांगत बसणार नाही. कारण की तो विषयच नाही. असो.) डियर तुकोबा घेतलं आणि साधारण दोन ते तीन दिवसांमध्ये वाचून काढलं. पुस्तकाच्या नावावरून पुस्तकाच्या स्वभावाचा मी काही अंदाज बांधला होता पण ते सगळे अंदाज फोल ठरवीत पुस्तक मला अधिकच रंजक आणि अत्यंत वेगळं वाटलं.
याचं कारण लेखकाने तुकोबांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि आजचं यांत्रिक, आधुनिक जग याची घातलेली सुरेख अशी सांगड हे आहे. हा संगम इतका सुरेख झालेला आहे की तो कुठेच विसंगत वाटत नाही. अधिकाधिक आपला वाटतो. तुकोबा आपल्या आजूबाजूला आहेत असं भासतं आणि तुकोबा अधिक योग्यरीत्या समजून, उमजून जातात. लेखकाने या पुस्तकात असा काही चमत्कार केलेला आहे की तुकोबा हे समकालीन होऊन जातात. तुकोबांची विचारधारा, अन्यायाविरुद्ध त्यांची असलेली चीड, त्यांच्या एकूण अभंगातील आणि जगण्यातील बंडखोरी आणि त्यांच वेळी त्यांचं कोमल हृदय आणि पांडुरंगा प्रति असलेला अनन्य भाव अधिक ठळकपणे वाचक म्हणून आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. हे लेखक विनायक होगाडे यांच्या लेखनाचं कर्तुत्व आहे असं मला वाटतं.
पुस्तकाच्या रचनेबद्दल बोलायचं झालं तर पुस्तक हे तीन भागात विभागलेला आहे पहिला भाग हा “तुकारामायण” या नावाने आपल्यासमोर येतो. या भागात संत तुकाराम महाराज यांच्या भेटीला भारतातील तसेच महाराष्ट्रातील काही समाजसुधारक येतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात असा कल्पनाविलास करण्यात आलेला आहे. त्यातून महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आपल्यासमोर येतो. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा पाया तुकोबाच का आहेत या प्रश्नाचं उत्तर या भागातून आपल्याला मिळून जात.
दुसरा भाग “मीडिया ट्रायल ऑन तुकोबा” या नावाने आपल्यासमोर येतो. पुस्तकाचा मूळ गाभा म्हणजे हेच प्रकरण आहे. तुकोबांच्या आयुष्यातील काही घटनांची मांडणी लेखक या भागात करतात. आता तुकोबांच्या आयुष्यातील त्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती महाराष्ट्राच्या मराठी मनाला आधीच आहे. परंतु त्या घटनांचा आजच्या प्राप्त परिस्थितीशी सुरेख संगम करून लेखक ज्या पद्धतीने नव्याने त्या घटना उभ्या करू पाहतो ते वाखाण्याजोग आहे. हे पर्सनली मला खूप आवडलेलं आहे. आता ते नक्की काय आहे हे मी इथे सांगणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुस्तक विकत घेऊनच वाचावे लागेल. तेव्हा त्यातील मर्म तुम्हाला कळेल. तुकोबांचे दुःख कळेन, त्यांचा संघर्ष कळेल, त्यांची भक्ती कळेल आणि त्यांचा पुरोगामी विचारही कळेल.
पुस्तकाचा तिसरा भाग डियर तुकोबा या नावाने लेखक आपल्यासमोर ठेवतात. लेखकाने पत्राच्या स्वरूपात थेट तुकोबांशी साधलेला हा संवाद आहे. संवाद म्हणजे लेखकाचं तुकोबांवर किती प्रेम आहे हेच लेखक इथे सांगून जातात. तो संवाद आपल्याला विचार करायला लावतो आणि तुकोबांच्या अधिक जवळही घेऊन जातो. त्यांच्या अभंगांची गाथा जी इंद्रायणीत बुडवली होती ती गाथा त्यात संवादातून शेवटी शेवटी आपल्यापर्यंत येऊन ठेपते आणि तरते.
लेखकाचा मूळ विचार आणि पुस्तकाचे मुळ प्रयोजन आपल्याला याच पत्रात गवसत.
आजची तरुण पिढी संत साहित्यापासून दूर जात आहे असं वाटत असताना कुणीतरी आपल्यातलाच उठतो आणि संत साहित्याशी आणि तुकोबांची संवाद साधतो. हे चित्र खूपच आशादायी वाटतं आणि मनाला सुखावून जाणार आहे.
सरते शेवटी इतकच सांगेन की आजच्या तरुण पिढीचा महाराष्ट्राकडे, महाराष्ट्र धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घ्यायचा असेल तर “डियर तुकोबा” सारखी पुस्तके आपल्याला आपल्या संग्रहात ठेवायलाच हवीत.
शेवटी इतकंच की, एकदा नक्की वाचा विनायक होगाडे लिखित “डियर तुकोबा…”
#सत्यशामबंधू
#_shubhra_
#vinayakhogade
#deartukoba
#santtukarammaharaj
टिप्पण्या