आज रक्षाबंधन...

आज  रक्षाबंधन. दि. ११/०८/२०२२

भारतीय संस्कृतीत बंधनाला खूप महत्त्व आहे. कुठलाही समाज हा एकट्याने अस्तित्वात येत नसतो. समाज नावाची व्यवस्था उभी राहायला एकापेक्षा अधिक लोकांची गरज असते. आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी काही समाज धुरिणांकडून काही बंधन-नियम आखण्यात आले आणि त्यांचेच पुढे सण समारंभ झाले असं माझं मत आहे. त्यातीलच एक बंधन म्हणजे रक्षा बंधन... 

बहिणीचे भावाने रक्षण करावे यासाठी हि संकल्पना अस्थित्वात आली असावी असे वरपांगी दिसून येते. पृथ्वीवरील काही मोजक्या संस्कृत्या सोडल्या तर जवळपास सर्वच संस्कृत्या या पुरुषप्रधान आहेत. त्यामुळे अनेक सण हे त्या नुसारच डिझाईन झालेले दिसतात. पण आजच्या काळाचा विचार केला तर यात अनेक क्रातींकारी बदल होताना दिसतात. आता रक्षाबंधनाचाच विचार केला तर असे दिसून येते कि, आज रक्षाबंधन हे साथ, सोबत करणाऱ्या प्रत्येक नात्याकडून बांधून घेतेले जाते. तू माझे रक्षण कर एवढाच आता हेतू रक्षाबंधनामागे राहिलेला नाहीये. हे प्रमाण अत्यल्प जरी असलं तरी ते आशादायी निश्चितच आहे. 
भाऊ बहिणीचे रक्षण करू शकतो, तिला साथ देऊ शकतो, तिच्या मागे ठामपणाने उभा राहू शकतो. पण एक बहीण सुद्धा तेच सर्व त्याच्या भावासाठी हि करू शकते हे गृहीत आता समाज स्वीकारू लागलेला आहे. 

भावंडं कशी असावी असा प्रश्न पडला कि माझ्या डोळ्यासमोर उत्तरादाखल निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या संतविभूतींचा संपूर्ण जीवनप्रवास उभा राहतो. 
माऊलीचा आजचा पालखी सोहळा पाहिला कि, आपला समाज किती विसरभोळा आहे हे लक्षात येतं . माऊलीच्या हायतीत त्या चारही भावंडांना आळंदीकरांनी तुच्छ लेखलं. सग्यासोयऱ्यानी पाठ फिरवली. भिक्षापात्रात अन्ना ऐवजी कधी कधी केर कचराही टाकला. पाण्यासाठी पाणवठे बंद केले. परंतु असं जरी असलं तरी माउलींच्या साहित्यात याची कुठेही वाच्यता दिसत नाही हे माऊलींचे मोठेपण.. 
परंतु त्यांच्या अभंगाचा नीट अभ्यास केला कि त्यांच्या भावविश्वात डोकावून पाहता येत. 

इथे मुक्ताईचे अभंग अधिक बोलके होतात. प्यायला पाणी मिळत नाहीये अशा वेळी मुक्ताई पाणी भरण्यासाठी इंद्रायणीकाठी जातात. या पाण्यावर तरी कुणाचा अधिकार नाहीये. ईशवराने नदीचे पाणी सर्वांसाठी दिल आहे. या पाण्यावर कुणा एकाचा अधिकार नाहीये.. असा विचार करून कुणी पाहत तर नाहीना हे पाहत दबक्या पावलाने मुक्ताई इंद्रायणीच्या डोहात उतरते. मडके भरून घेते आणि घाईत झोपडीच्या दिशेने निघते. पण कुठून तरी एक दगड येतो आणि मडकं फुटून पाणी सांडून जात. मुक्ताई ओल्या होतात. त्या पाण्याबरोबर त्यांचे डोळे हि वाहू लागतात. हमसून हमसून रडणाऱ्या मुक्ताईला पाहून माउली व्यथित होतात. दुखी होतात. त्यांना प्रचंड राग येतो. आणि ते स्वतःला झोपडीत कोंडून घेतात. हे पाहून एवढीशी मुक्ताई रडत रडत भावाला साद घालते, " दादा दार उघड.. दादा दार उघड.. माझ्यावर दया करा..."

मजवरी दया करा । ताटी उघडा ज्ञानेश्वर ।। 

समाजावर रागावलेल्या आपल्या भावाची समजूत येवढुशी मुक्ताई काढते आहे. 
योगी कुणाला म्हणावं हे ती सांगू पाहत आहे. सर्व अपराध सहन करणाऱ्या पावन मनाच्या योग्याची महती वर्णन करताना मुक्ताई म्हणते, 

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रम्ह, दोरा ॥
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

माउलींसारखी महान विभूती जगाला मिळाली ती मुक्ताईच्या या ताटीच्या अभंगांमुळे असं माझं मत आहे. राग आलेल्या दादाला शांत करणारी मुक्ताई ताटीच्या अभंगातून माऊलींची हि आई होते. हे सामर्थ्य मुक्ताईचं आहे आणि तिची कूस सांगणाऱ्या प्रत्येक मुलीचं आहे. 

#सत्यशामबंधू 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा