शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बघिणींनो आणि मातांनो ...,


मी माझ्या भाषणाची सुरुवात मुद्दामच अशी केली. कारण आज मी बोलणार आहे अखंड हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल. 

बाळासाहेब म्हणजे आग, 

बाळासाहेब म्हणजे तेज,

बाळासाहेब म्हणजे ताठ कणा ,

बाळासाहेब म्हणजे ठाकरी बाणा,

बाळासाहेब म्हणजे हिंदूंची आन, बान , शान.. 

अन बाळासाहेब म्हणजे आम्हा शिवसैनिकांचे प्राण.... 


अशा ह्या भरतभूमिच्या वाघा बद्दल दोन शब्द बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. 


मित्रहो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपणाला ठाऊकच आहे. १०६ मर्द मराठ्यांच्या बलिदाने आपल्याला मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळाला. केवढे हे शौर्य आणि केवढा हा त्याग... मी त्या सर्व शहिदांसमोर नतमस्तक होतो.

माझा तुम्हाला सवाल आहे.. काय संयुक्त महाराष्ट्र झाल्याने मराठी जनांचे प्रश्न सुटले होते..? काय मराठी जनांना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या होत्या...? दुर्दैवाने याची उत्तरं नाही अशीच द्यावी लागतात. आपल्या दुबळेपणाचा फायदा कायमच परके घेत आले आहे. इथे हि तसेच झाले. मुंबई तर मिळाली पण मुंबईतील नोकऱ्या..... नाही.. त्या नाही मिळाल्या.... मद्रासी, गुजराती, बिहारी लोक मुंबईच्या आर्थिक  नाड्या स्वतःच्या हातात घेऊन मस्तवाल हत्ती प्रमाणे बसले होते. आणि या मध्ये मराठी माणूस भरडला जात होता. 

मराठी माणसाने स्वतःच्या हक्काची जमीन तर लढून मिळवली होती.. पण आता लढाई पोटासाठी पुन्हा करायची होती. 

काळ सोकावला होता.. मराठी माणूस पिसला जात होता.. स्वतःच्या हक्काच्या घरात लाचारा सारखा तो खितपत पडला होता. 

पण….... पण.. अशा ह्या दुष्टचक्रात, अशा अन्यायाने ग्रासलेल्या काळात मुंबईच्या दमट हवेत काटक शरीराचा, करारी बाण्याचा आणि अन्यायाच्या कानाखाली जाळ काढून अन्यायाला जाब विचारण्याची धमक असलेला एक तरुण वावरत होता. 

तो तरुण म्हणजे, अखंड हिंदुस्तानचे दैवत राजा शिवछत्रपती यांच्या विचारांचा आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा समर्थपणे  पुढे घेऊन जाणारा अस्सल मरहट्टा गडी ......... बाळ केशव ठाकरे... 


वंदनीय बाळासाहेब ठाकरे... 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...  


प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा बाळासाहेबांवर विशेष प्रभाव होता. याच प्रभावातून ते कायम लढवय्ये राहिले. न्याय मिळत नसेल तर तो कानाखाली वाजवून मिळवा पण न्याय मिळायलाच हवा.. अश्या तेजस्वी विचारांनी ते लहानपणा पासूनच प्रभावित झाले होते.


मराठी माणसावरील होत असलेला अन्याय बाळासाहेब उघड्या डोळ्याने पाहत होते. पदोपदी अपमान सहन करावा लागतो आहे हे त्यांच्या अंगातील गरम रक्ताला सहन होतं नव्हतं. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी भल्याभल्याना घाम फोडला होता.  पण जर सकल मराठी जनांच्या घरात आनंदाची दिवाळी साजरी करायची असेल तर या अन्याया विरोधात जनआंदोलन उभं करायला हवं असा क्रांतिकारी विचार त्यांच्या मनात आला.  आणि इथेच एका संघटनेची बीजे रोवली.

प्रबोधनकारांनी नाव सुचवलं, श्रीकांतजी ठाकरे आणि मासाहेबांची साथ मिळाली,  बाळासाहेबांनी नारळ फोडला आणि महाराष्ट्राच्या भूमीत शिवसेनेचा जन्म झाला. 

शिवसेनेच्या जन्मानंतर बाळासाहेबांचा झंझावात सुरू झाला. बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखू लागला. जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे ठाकरीशैलीने न्याय मिळू लागला. मराठी माणसाच्या हक्काच्या जागा हक्काने  मिळू लागल्या. एअर इंडिया, भारतीय रेल्वे, सरकारी ऑफिसेस या सर्व ठिकाणी मराठी माणसाचा टक्का वाढत गेला. मुंबईत मराठी माणसाला हक्काचा आवाज मिळाला. हेच वादळ नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं. पुढचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. तो इथे मी मांडत बसत नाही.


पण मला बाळासाहेब का आवडतात..? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर त्याच उत्तर मात्र मी नक्की देईल.

मला बाळासाहेब का आवडतात…. समोरचा कोण आहे हे न पाहता त्याने जर अन्याय केला असेल तर त्याच थोबाड फुटणारच.. म्हणून मला बाळासाहेब आवडतात.


मला बाळासाहेब का आवडतात…  समोरचा कुठल्या जातीचा आहे न पाहता साध्या साध्या माणसाना त्यांनी आमदार खासदार केलं म्हणून मला बाळासाहेब आवडतात.


मला बाळासाहेब का आवडतात… रक्त जर शांत झाल असेल तर ज्यांची भाषणं ऐकून शरीरातील धमन्या तातताड उडतात ते ठाकरी उवाच म्हणजे बाळासाहेब म्हणून मला बाळासाहेब आवडतात.


मला बाळासाहेब का आवडतात…हिंदुत्वाच्या नावाखाली पुन्हा जातीयता माजवणाऱ्या मजोरड्यांना तेच बेधडक पणे सांगत होते की माझं हिंदुत्व जानव्यात अडकत नाही.. म्हणून मला बाळासाहेब आवडतात.


मला बाळासाहेब का आवडतात… निवडणूक न लढताही हजारो लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करता येत हे त्यांनी दाखवून दिलं.. म्हणून मला बाळासाहेब आवडतात.

मला बाळासाहेब का आवडतात… माझ्या शिवबाचा भगवा जेव्हा झुकू पाहत होता तेव्हा अंगी शिवबाच तेज लेवून बाळासाहेब उभे राहिले आणि लाखो शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवा पुन्हा  डौलाने फडकू लागला , हे महान कार्य केलं म्हणून मला बाळासाहेब आवडतात. 


अशी अनेक कारणं सांगता येतील.. पण बाळासाहेब मराठी मुलखात जन्माला आले हे अखिल महाराष्ट्राच भाग्यच मानायला हवं. 


आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवणारे आणि अंगात रग निर्माण करणारे, 

सांगून न्याय मिळत नसेल तर कानाखाली वाजवून न्याय मिळावा पण न्याय झालाच पाहिजे असा मूलमंत्र देणारे,

तुझ्यात जर आत्मबल असेल तर तुला जगाच्या पाठीवर मरण नाही असा क्रम सिद्धांत मांडणारे,

बाळासाहेब….. दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी तमाम शिवसैनिकांना अनाथ करून इहलोक सोडून गेले. 

बाळासाहेब गेले… पण त्यांचा विचार अजुनही आहे आणि तो हा चंद्र सूर्य असे पर्यंत राहील. त्यांची शिवसेना आजही महाराष्ट्राच्या  कणाकणात अन्याया विरोधात लढा देत आहे हे बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या तेजामुळेच….


मित्रहो… बाळासाहेब ठाकरे या महान व्यक्तीवर कितीही वेळ बोललं तरी शब्द कमी पडतील. बाळासाहेब हे शब्दांचे जादूगार होते त्यांच्या चरणांवर मी माझे हे तोडके शब्द अर्पण करतो  आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो..


जय हिंद.. जय महाराष्ट्र…!!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा