थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा


"थिजलेल्या काळाचे अवशेष" नीरजा यांची ही पहिली कादंबरी. 

भारत आणि त्याची ओळख विविधतेत एकता अशी आहे. किती भारी ओळख आहे ही... शाळेत असताना आपल्या सगळ्यांना ही ओळख पहिल्यांदा झाली ती प्रतिज्ञेमधून .. 

भारत माझा देश आहे... आमकं, तमकं, फलानं, बिस्तानं  अशी एक प्रतिज्ञा होती आपल्याला, तुम्हाला नीट लक्षात असेल तर आठवेल..  त्याच प्रतिज्ञेत एक वाक्य आहे..

"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विवीधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे..." 

किती मस्त वाक्य आहे हे.. पण या वाक्याला आता काहीही अर्थ उरलेला नाहीये. किती लोकांना या देशाची विविधता मान्य आहे..? हा मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. "एकता" तर कुठच्या कुठं तोंड काळं करून लपून बसलीये तीच तिला माहीत. प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म पाहून मी नक्की कोणत्या बाजूला असावं हे आपण आता ठरवायला लागलोय. या अशा मत निर्मितीत कसलाही विचार उरला नाही, कसलाही आचार उरला नाही. कुणीतरी येतो आणि काहीतरी सांगतो आणि आपण ते खर मानतो येवढी बौद्धिक क्षमता आपली खालावली आहे. 

वर्षानवर्षं ज्या वर्ण व्यवस्थेने आपल्यातल्याच एका वर्गाला प्रचंड प्रमाणात छळलं तेच भूत आता कुठं आपल्या मानगुटीवरून उतरत होत तर असं काय झालं की मागील दशकभरात आपण पुन्हा त्याच वाटेने जाऊ पाहतोय.. पुन्हा विभागलो जातोय.

बहुसंख्याकवाद, अतिरेकी राष्ट्रवाद आणि त्याचं बरोबर बोकाळत असलेला नव-हिंदुत्ववाद या विचारसरणी देशाच्या शास्वत ओळखीला आज धोका बनू पाहत आहे.. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळ लोकशाही मार्गाने होत आहे. 

या दुफळीची बीजे जरी इतिहासात रुजली गेलेली असली तरी मागील दशकभरात या गोष्टींनी प्रचंड वेग धारण केला आहे आणि देशातील तरुण यात मेंढरं चरायला जावीत तसा बिनधिक्कतपणे जातोय. 

भारताच्या एकूण सामाजिक, राजकीय, वैचारिक, धार्मिक आणि इतर सर्व वैचारिक पातळीवरील विचार प्रवाह नक्की किती आणि कशा प्रकारे बदलले आहेत याचा उहापोह ही कादंबरी करते. 

ही एक चर्चात्मक कादंबरी आहे. त्यामुळे यातील प्रत्येक पात्र सतत बोलत असत. अनेक प्रश्न, त्यांची अनेक उत्तर, काही पटणारी, काही खटकणारी, काही विचार करायला लावणारी.. हा संपूर्ण संवाद या कादंबरी बरोबर आपला आपल्याशी ही सतत सुरू असतो. 



दिल्लीच्या JNU मध्ये १९८६-८७ या बॅच मध्ये शिकणारा एक ग्रुप.. शिक्षण संपवून आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालेला आहे. कुणी हे स्थिरावलेपण मनापासून स्वीकारलं आहे तर काहीही मन मारून.. कॉलेजमध्ये असणारी प्रचंड ऊर्जा या सर्वांनी गमावली आहे आणि आजूबाजूच्या वातावरणात रममाण झालेली आहे. विविध धर्माची, विचाराची, आणि  राज्य प्रांतांची ही पात्रे आपल्या सर्वांची प्रातिनिधिक रूपे म्हणून या कादंबरीत येतात. 

'नजमा' हे या कादंबरीचं मध्यवर्ती पात्र आहे. परदेशात नवऱ्या बरोबर राहणारी ही एक स्वतंत्र विचाराची महिला आहे. जी भारतात येवून तिच्या कॉलेजच्या मित्र आणि मैत्रिणींना एक एक करून भेटते, त्यांच्या सोबत राहते आणि शेवटी त्यांचा सर्व ग्रुप JNU मध्ये गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र येतो. नजमाच्या या संपूर्ण प्रवासात ती संपूर्ण भारतभर फिरते. यातून जो संवाद आणि जी चर्चा लेखक म्हणून नीरजा घडवू पाहतात जी प्रभावीपणे घडते आणि आपल्या पर्यंत पोहचते सुद्धा.. हे या कादंबरीचं यश आहे.. 

आजूबाजूला भुकेने व्याकूळ होऊन लोकं मरत असताना, जातीय मानसिकतेतून अनेक नाती तुटत असताना-मरत असताना, देशातील सामाजिक सलोखा खालावत असताना आपलं सतत 'पार्टी मूड' मध्ये असणं आणि आपल्याला कशाचाच काही फरक पडत नाही या मानसिकतेत असणं देशासाठी, समजासाठी किती घातक आहे हे समजून घ्यायला हवं. वर प्रतिज्ञेविषयी व्यक्त केलेलं मत दुर्दैवाने खर आहे जो पर्यंत या कादंबरीतील विषय आपण समजून घेत नाही तोपर्यंत… 

जोपर्यंत हे काळाने थिजवलेले अवशेष प्रवाहित होत नाहीत तोपर्यंत…  


- शुभम संदीप सोनवणे 


#सत्यशामबंधू #_shubhra_ #नीरजा #मराठी #bookreader 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

उदाहरणार्थ कोसला वगैरे....