फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी

फकिरा… 

उशिरा हातात पडलेली एक असामान्य कादंबरी.


‘स्मशानातलं सोनं’ हा कुठल्याशा इयत्तेत आम्हाला एक धडा होता.  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाची आणि त्यांच्या वास्तववादी लेखनाची इथेच ओळख झाली. 

खाण अचानक बंद झाल्याने भीमा आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. ती वेळ आणि ती गरिबी भीमाला स्मशानापर्यंत घेऊन जाते आणि जळकी मढी उकरायला लावते, त्या राखेतून सोनं गोळा करायला लावते. गरिबांचा हा संघर्ष अण्णा भाऊ पोटतिडकीने उभा करतात. तेव्हा त्यांची लेखणी खोल खोल रुतत जाते.  

तो धडा वाचल्यापासून अण्णा भाऊंच्या लेखणीवर आणि पर्यायाने त्यांच्यावर विशेष प्रेम जडलं आणि ते वाढत गेलं. अण्णा भाऊंच्या साहित्याविषयी विलक्षण ओढ निर्माण झाली. परंतु एक सल मात्र मनात कायम राहील, ती म्हणजे ‘फकीरा’ फार उशिरान हातात पडली. 

पण असो… ती मी वाचली हे महत्वाचं..

अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा ही कादंबरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. ही अर्पण पत्रिकाच फाकिराच्या संघर्षमय वाटचालीची प्रचीती देऊन जाते आणि ती फकिरा वाचताना खरी ही ठरते.

आता कादंबरी विषयी बोलायचं झालं तर, ही कादंबरी बाप लेकाच्या संघर्षमय जीवनाची गोष्ट आहे. धिप्पाड मांग-महाराच्या जीवनाची करूण कहाणी आहे. इंग्रजी सत्ता भारतात स्थिर स्थावर झाल्यानंतर बदललेल्या गावगाड्याच्या कारभाराची ही गोष्ट आहे. इंग्रजी सत्तेचे गुलाम होऊन आपल्याच माणसांच्या मानगुटीवर बसून त्यांचं रक्त पिणाऱ्या जमीनदार माणसांची आणि त्यांच्या इर्षेची ही गोष्ट आहे. गावच्या आणि गावातील प्रत्येकाच्या मागं निर्धारानं उभं राहणाऱ्या पंत-पाटलाची ही गोष्ट आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी, गावाला आणि आपल्या माणसांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी स्वतः ची मान अर्पण करणाऱ्या गणोजी मांगाची आणि वारणेच्या खोऱ्यात जन्माला येवून बापाच्या खुनाचा सुड घेणाऱ्या आणि प्रती सरकारशी नात सांगून इंग्रजी सत्तेला आव्हान देऊ पाहणाऱ्या गणोजीच्या बहाद्दर लेकराची म्हणजेच फकिराची ही गोष्ट आहे. 

अण्णा भाऊ साठेंचा जन्म हा ही वारणेच्या खोऱ्यातीलच. त्यामुळे संपूर्ण कादंबरी भर येनकेन प्रकारे सातारा सांगली हा पट्टा आपल्या समोर येतोच येतो. या कादंबरीच्या निमित्ताने इतिहासात उल्लेख न झालेल्या अनेक ज्ञात अज्ञात शुर वीरांची जीवनकथा अण्णा भाऊ इथे फकिराच्या रूपाने मांडू पाहतात. कादंबरी भर विखुरलेली असंख्य पात्र अण्णा भाऊंनी पाहिलेली होती, ऐकलेली होती. त्यांच्या संघर्षाला आणि जीवनाला अण्णा भाऊ या कादंबरीच्या रूपाने न्याय देऊ पाहतात. 

कादंबरीतील एक एक प्रसंग हा अंगावर येवू पाहतो, अंगात भिनतो. चित्रपटाच्या रिल प्रमाणे एक एक प्रसंग भराभर डोळ्यासमोरून सरकत जातो आणि प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. इतका जिवंतपणा ह्या कादंबरीत आहे.. त्यातील प्रत्येक शब्दांत आहे. आणि हेच अण्णा भाऊंच्या लिखाणाचं कसब आहे. 


त्या काळाचा विचार करता त्या काळी काही प्रथा परंपरा जीवापाड जपल्या जातं. इतक्या की समोरच्याला मारायला ही लोक पुढं मागं पाहत नव्हती आणि त्याचं वेळी त्या परंपरेसाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नव्हती. अशी एक परंपरा फकिराच्या गावात असते. ती म्हणजे एक प्रकारे दोन गावांचा संघर्ष असतो. ज्या गावात जोगीन त्या गावाची जत्रा, असा तो प्रकार असतो. ती जोगिण आपल्या गावाचा सन्मान वाढवण्यासाठी गणोजी मांग शेजारच्या गावातून मोठ्या मुश्किलीने घेऊन येतो पण तो येत असतानाच शेजारच्या गावाच्या खोत पाटलाच्या पोराकडून तो कपटाने मारला जातो. गावाला मान मिळतो पण बाप मारला जातो. त्यावेळी फकिरा अजाणत्या वयातच असतो परंतु आपला बाप का मेला आणि कशासाठी मेला याची त्याला जाणीव असते. पुढे जाऊन जो बापाच्या कुणाचा बादला कसा घेतो, मांग महार वाड्यात कोणती संकट उभी राहतात, त्यांना फकिरा कसा सामोरा जातो आणि पुढे जाऊन इंग्रजी सत्तेला कस आव्हान देऊ पाहतो हे सगळ तुम्हाला कादंबरीत वाचावं लागेल कारण ते इथे सांगणं संयुक्तिक ठरणार नाही. 

ही कादंबरी म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा नुसता कल्पनाविलास नाही. ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कुठलंही ललित लेखन हे अनुभवातून आलेल आत्मकथनच असतं आणि हे अण्णा भाऊ त्यांच्या प्रस्तावनेतच स्पष्ट करतात. या कादंबरीला वि.स.खांडेकरांची संवादात्मक प्रस्तावना लाभलेली आहे. त्यामुळे अण्णा भाऊंच्या लेखनाची आणि कादंबरीची वी. स. खांडेकरांसारख्या एका महान लेखकाकडून झालेली समीक्षा कादंबरी वाचायला अधिकच प्रवृत्त करते. 

सामाजिक न्यायाला बांधील असलेल्या, दलित साहित्याला एका उंच शिखरावर घेऊन जाणाऱ्या अस्सल मराठमोळ्या भाषेतील ही कादंबरी प्रत्येकानेच वाचायला हवी. संघर्ष किती मोठा असतो आणि तो का करावा लागतो याचे उत्तर म्हणजे ही कादंबरी आहे. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही ही कादंबरी नक्की वाचावी. 

#सत्यशामबंधू #_shubhra_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

उदाहरणार्थ कोसला वगैरे....