आठवणीत राहील अशी संध्याकाळ आणि ती...

आठवणीत राहील अशी संध्याकाळ...आणि ती.!!

कोसळणारा पाऊस, पळणारी माणसं, धावणाऱ्या गाड्या, वाफाळलेला चहा आणि सोबत आपलं वाटावं अस सुंदर माणूस.... किती मस्त वाटत ना..?
पण बहुतेक वेळा असा अनुभव आपल्याला क्वचितच येतो आणि बहुतेक वेळा तो आपल्याला घडवून ही आणावा लागतो. माझ्या बाबतीत असा अनुभव मात्र आपसूकच घडला.

कामा निमित्ताने पुण्याला जाणं झालं. पुण्याला जायला तस कारण लागत नाही. उगाच म्हणूनही मी पुण्याला अनेक वेळा गेलेलो आहे. पुण्याचे रस्ते आणि पुण्याची माणसं हे माझे आवडीचे विषय..!  बस मधून उतरताना माझ्या समोरच्या आजोबांना मी विचारलं, ' उतरायचे का बाबा..?' बाबा म्हणाले, ' मग पुढ कशाला आलोय, काय बाजाराला बसायचे का..?' मी आपलं उतरून घेणं पसंत केलं. ही अशी माणसं तुम्हांला पावला गणिक मिळतील... मस्त असतात ती...!!!

काम झाल्यानंतर माझी घरी जायची घाई सुरू झाली. कारण  घरी जाताना मध्ये वाघोली नावच एक अक्राळ विक्राळ गाव लागत. ट्राफिक साठी हे गाव खूप प्रसिद्ध... त्यामुळे लवकरच निघालो.  पाऊस सुरूच झाला होता आणि बस मध्ये खूपच गर्दी होती त्यामुळे प्रचंड शीण आला होता. अपेक्षेप्रमाणे वाघोलीत प्रचंड ट्राफिक होतं... त्यामुळे शीण आणखीन वाढत होता.
बस मधून वाघोली कडे पाहिलं तर ती घामाने दमून गेलेल्या बाई सारखी दिसत होती. तिच्याकडे पाहिल्यावर माझ्या शिनवट्यात आणखीन भरच पडली...
प्रचंड ट्राफिक मधून कसा तरी माग काढत बस केसनंद फाट्यावर आली.. मीही सुटकेचा निश्वास टाकला आणि बस मधून उतरलो. मला शिक्रापूर ला जायचं असल्याने अजून प्रवासच टेंशन होतच त्यात रात्रीचे 8 वाजत आले होते.
दुसऱ्या बस साठी मी स्टॉप वर थांबलो होतो. तेवढ्यात मागून आवाज आला, " समीर.."

आवाजाच्या दिशेने मी वळून पाहिलं. ती तीच होती.. ती तशीच होती.. मी तिला जस पाहिलं होत  तशी... काहीच बदल झाला नव्हता. तीन वर्षांनी आमची भेट झाली होती. एका कंपनी मध्ये आम्ही एकत्र काम करायचो. थोडी थोडी ती आवडायची मला.. पण मी कधी विचारलंच नाही, धाडसच झालं नाही म्हणा ना...!! तिला ही मी अवडायचो असा मला उगाच संशय यायचा.. तिनेही कधी विचारलं नाही आणि मीही..
आधी तिने ऑफिस सोडलं आणि नंतर मी..!

तिला पाहिल्यावर मी जरा भूतकाळात हरवूनच गेलो. तिने भानावर आणत मला विचारलं, " समीर, इकडे कुठे..?"

"हा प्रश्न मी तुला विचारायला हवा,तु इकडे कुठे ? मुंबईला होतीस ना..?" मी म्हणालो.

" हो तिकडेच असते, काही दिवस मावशीकडे आली होते. इथे वाघोलीतच राहते ती.उद्या जाणार आहे." तिने उत्तर दिलं.

" Ok.., मग बाकी..?" मी आपलं काही सुचत नसल्यामुळे बोललो.

" बाकी निवांत..मस्त चाललंय." ती बोलली.

"लग्न केलं की नाही..? मी उगाच नको तो प्रश्न विचारला होता.

" नाही रे अजून" तिने पटकन उत्तर दिलं.
आता आमचं पुढे काहीही होणार नव्हतं तरीही मला तिच्या उत्तराने उगाच हायसं वाटलं. 

थोडं थांबून ती मला म्हणाली, " तुझं झालं लग्न..?"

"छे.. छे.. नाही ..नाही... , तेव्हाही कुठली मुलगी आमच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि आजही पाहत नाही. आमचा काय प्रत्येक दिवस सारखा..!" माझ्या उत्तरावर मीच मोठ्याने हसलो. ती मात्र गप्प होती. ती गप्प पाहून मी माझ्या हसण्याला आवर घातला.

" समीर, तु ना.. बावळटच आहेस, तुझं त्याही वेळी लक्ष नव्हतं आणि आजही नाहीये.." तिच्या या म्हणण्यावर मी जरा गंगारूनच गेलो.
मला गोंधळलेला पाहून तीच पुढे म्हणाली,
"गम्मत केली रे, एवढा काय टेंशन घेतो."

मग आम्हीही थोडं हसायचं म्हणून हसलो. वेळ जात होता. बसचाही टाइम झालं होता. तीन वर्षांनी भेटलेली ती आणि तिला आत्ता तीनच मिनिटांत पुन्हा सोडून जायचं होतं. मन एका विषण्ण काळजीत पडलं. हा काळ इथेच थांबवा, अस वाटायला लागलं. पण ते माझ्या हातात नव्हतं. काळ जाणार होता आणि तीही..

" चल समीर, येते मी..." ज्याची अपेक्षा होती तेच ती बोलली.

ती जाऊ लागली मी तिच्याकडे पाहत होतो. तिची पाठमोरी आकृती लहान लहान होत चालली होती. पुढे थोडं थांबून तिने मागे पाहिलं. माझ्याकडे पाहून ती जराशी हसली मी हसलो. ती जाणार इतक्यात मी तिला हाक मारली,

" राधा.... जरा थांब.." 

मी हाक मारताच ती थांबली. मी तिच्या जवळ जात तिला विचारलं,

" आता केव्हा भेटशील..."

" माहीत नाही..? तिने अगतीक पणे उत्तर दिलं.

थोडं थांबून मी तिला म्हणालो, "  मग तुझा मोबाईल नंबर देतेस का..?"

" का.. कशाला हवा आहे..?"  तिने जर मिश्किल पणे विचारलं.

मी म्हणालो, " ठीक आहे नको देऊ... जातो मी ?"

मी जाणार इतक्यात मला थांबवत ती म्हणाली, " अरे चिडतोस काय.. समीर तु अगदी तसाच आहेस, लगेच चिडतोस.. "

" आणि तुही अगदी तशीच आहेस, कायम माझी फिरकी घ्यायचीस." मी तिला जोडून म्हणालो.

तिने मला तिचा मोबाईल नंबर दिला.. मीही दिला.  माझ्या बसची वेळ झालेली असल्याने मी तिचा निरोप घेतला.

मी पुन्हा बस स्टॉप वर आलो. थोड्या वेळातच बस आली. बस मध्ये मी बसलो. आणि इतक्यात माझ्या मोबाईल वर msg आला.  
राधाचाच msg होता. आता खऱ्या अर्थाने आमचा प्रवास सुरु झाला होता.

आठवणीत राहील अशी संध्याकाळ... आणि ती.. पुन्हा भेटावी....

--- सत्यशामबंधु


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी