हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ-माझ्या नजरेतून

हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ 

माझ्या नजरेतून….


देशीवाद म्हणजे काय…? ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नेमाडेंनी राबवलेली एक प्रचंड, महाकाय, आणि भयंकर शोधमोहीम म्हणजे हिंदू….

हिंदू हा शब्द पाहून मी ही कादंबरी घेतलीच नाही. हिंदूला टॅगलाईन देताना नेमाडे लिहितात "जगण्याची समृद्ध अडगळ.." मनात विचार आला, अरे ही काय भानगड आहे. एकीकडे समृद्ध म्हणायचं आणि परत तिला अडगळ ही म्हणायचं. बस्स, हे एकमेव कारण आहे हिंदू वाचण्यामाग. 

अत्यंत भुरसट, तकलादू, बालिश, खुळचट अशा हिंदुत्वाच्या कल्पना आपण सर्वांनी केलेल्या आहेत. हिंदू असणे म्हणजेच भारतीय असणे अशी समजूत आता एवढ्यात तर खूप वाढू लागलेली आहे. देशात तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून तर हे प्रमाण अधिकच वाढू लागलेल आहे. पण अस थेट विधान मी काही करणार नाही. कारण हा जो काही कट्टरतावाद फोफावतो आहे तो ह्या पाच सहा वर्षात झालेला नाहीये. देश स्वतंत्र झाल्यापासून जी कॉग्रेसी सरकारं देशावर राज्य करून गेली त्यांचा ही ह्यात मोठा वाटा आहे.  स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि कालांतराने धर्मनिरपेक्षता अशी तत्व भारताच्या संविधानाने स्वीकारली. धर्मनिरपेक्षता तत्व स्वीकारताना आपल्याला आपण समान आहोत हे पुन्हा सांगावं लागलं. आपला देश हा इतका विविधांगी घटकांनी व्यापलेला आहे की अस परत परत आपल्याला सांगावच लागत की आपण एक आहोत, भारतीय आहोत.  

जागतिकीकरणानंतर शहरांचा विकास झपाट्याने झाला. मुळात शहराचा विकास करणे म्हणजे देशाचा विकास करणे हा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. खेडी मागे राहत गेली आणि संपत गेली. काही संपली आणि काही संपवण्यात आली. हे सगळं सगळ्यांसमोर सगळ्यांच्या डोळ्यादेखत होतं राहिलं. एकीकडे हे सगळं विकासाचं चित्र उभं राहतं असताना दुसरीकडे मात्र हिंदुत्वाचे धार्मिक आणि सामाजिक केंद्रीकरण होत होतं. आज ते इतकं जटिल आणि भक्कम झालं आहे की त्याला पुन्हा विकेंद्रित करण्यासाठी पुन्हा एका गांधीला जन्म घ्यावा लागेल. जे की आता एवढ्यात शक्य वाटत नाही. ह्या संपूर्ण परिस्थितीच्या वास्तविकतेवर नेमाडेंची हिंदू ही कादंबरी उभी राहिलेली आहे. 

पण हिंदुत्व म्हणजे काय..? 

असंख्य जातीपातींच्या, चालीरीतींच्या, रूढी परंपरांच्या जोखडाखाली जगत असलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायाची समृध्द पण तितकीच विस्कळीत अडगळ म्हणता येईल अशी जीवनपद्धती म्हणजे हिंदुत्व होय आणि ते लोक म्हणजे हिंदू.. 
 
अशी हिंदुत्वाची व्याख्या 'हिंदू' वाचल्यानंतर मी माझ्या बुद्धीला सुचली तशी केली आहे. ह्यात अनेक दोष, अपवाद असू शकतात. कुठलही विधान कधीच शत प्रतिशत सत्य नसतं. त्यात दोष असतोच असतो. दोष हीच शोधाची जननी असते. जिथे दोष असतो तिथेच शोध जन्म घेतो. 

'हिंदू' विषयी….

खंडेराव हा हिंदू ह्या कादंबरीचा नायक आहे. हिंदू ही कादंबरी रूढ अर्थाने खंडेराव चा जीवनपट मांडत नाही. पाकिस्तानातल्या मोहेंजोदडो पासून खान्देशातल्या मोरगाव पर्यंतच्या रेल्वे  प्रवासात खंडेरावच्या मनात जो पाच हजार वर्षा पासूनचा गोंधळ माजलेला असतो तो गोंधळ म्हणजे हिंदू.
सुखवस्तू आणि मातब्बर शेतकरी घराणं, वारकरी संप्रदायाचे संस्कार, वडलांचा तालुक्याच्या , जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा, अशा मोठा गोतावळा असलेल्या घरात खंडेरावचा जन्म झालेला आहे. घरची कृषी संस्कृती जपावी अशी वडिलांची इच्छा आहे. परंतु जंगलांचा नाश करून त्यावर उभ्या राहिलेल्या ह्या स्वार्थी संस्कृतीचा खंडेरावला प्रचंड तिटकारा आहे. पुरातत्त्व शाखेत पीएचडी करून मानवाच्या उत्क्रांती संबंधित काहीतरी ठोस शोध लावावेत अस त्याच स्वप्न आहे. त्या स्वप्नांच्या मागे तो धावतो आहे. त्यासाठी दिवसरात्र तो कष्ट करतो आहे. तो स्वतःच शिक्षण पूर्ण करत असतो. पीएचडी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून तो त्याच्या टीम सोबत मोहेंजोदडो येथे उत्खननाचं काम करत असतो. ह्याच भारावलेल्या दिवसात असताना अचानक त्याला घरून मोरगाव वरून एक पत्र येतं आणि तो हादरून जातो. पीएचडी अर्धवट सोडून तो मोरगावला भारतात परततो. अस कुठलं पत्र त्याला आलेलं असतं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला 'हिंदू' वाचावी लागेल. ते कारण मुदामहून मी इथे सांगणार नाही. 

हिंदू आणि नेमाडे…

२०१० साली आलेली 'हिंदू' मराठी साहित्याला चौथ ज्ञानपीठ मिळवून देणारी कादंबरी ठरली आहे. नेमाडेंची मराठी भाषेवर किती भक्कम पकड आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदू..
हिंदू मध्ये असंख्य कथा आहेत. यात असंख्य पात्र आहेत आणि त्यांच्या असंख्य कथा आहेत. लभान्या स्त्रिया, तिरोनी आत्या, चिंधु आत्या, कुंडलिक बुवा, निळूकाका, खंडेरावचे वडील विठ्ठलराव, त्याचा भाऊ भावडू, डॉ.मंडी, वर्गबंधु रघु नायक, भावी पत्रकार आणि संपादक अनंत राव जोशी, भावी दलित कवी बी.सी. वानखेडे, भावी वन अधिकारी आणि नवकवी मछिंदर मानकापे, खंडेरावचे सर-पवार सर, दवे सर ही मला त्यातली काही भावलेली पात्रे. याशिवाय बरीच पात्र आपल्यासमोर नेमाडे उभी करतात. त्यांची स्वतःची एक एक कहाणी असते. त्याच असंख्य कहाण्यांमधून नेमाडे हिंदू समाजाची अडगळ भासणारी चौकट आपल्यापुढे यशस्वीपणे उभी करतात. 
नेमाडे हिंदू मध्ये अनेक स्टेटमेंट करतात. ती नेमकेपणाने आपल्याला ओळखता यायला हवीत. त्यातूनच आपल्याला कुंडलिक बुवांना समजलेला धर्म समजतो. निळूकाकाला समजलेली देशभक्ती समजते. गांधींचा गांधीवाद समजतो. भारत पाकिस्तान वाद किती क्षुल्लक आहे हे समजतं. भारतीय कुटुंबव्यवस्था किती भक्कम पायावर उभी आहे हे लक्षात येताना ती आतून किती खिळखिळी झालेली आहे याचीही प्रचिती येते. जस ज्ञानेश्वरीचं सार पसायदानात सापडतं तसच हिंदूच सार हे खंडेरावच्या शेवटच्या भाषणात सापडतं. नेमाडेंनी तिथे मांडलेला विचार हा हिंदूचा कळससाध्य आहे. ते भाषण वाचायलाच हवं.

सरतेशेवटी

हिंदू ही टीकात्मक कादंबरी आहे. मानवजात उत्क्रांती पासून अधोगती कडे चाललेली आहे. चार पायांवर चालणारा माणूस दोन पायांवर चालू लागला येथून मानवाची शारीरिक अधोगती आणि अग्नीचा शोध लागल्या नंतर काही लाख वर्षांनी स्वयंपाकादी कामे महिलांनी आणि शिकारीची धाडसाची कामे पुरुषांनी करायची हे ठरलं तेथून मानवाची सामाजिक अधोगती सुरू झाली. उत्क्रांतीच्या त्या टप्प्या पासून ते मानवजातीच्या आजच्या अस्तिवापर्यंत नेमाडे हिंदूत ऊहापोह करतात. मानवाची धार्मिक बथ्थडता, जातीवाद, खिळखिळी झालेली कुटुंब व्यवस्था, 
मानवाचा समाजवाद अशा सर्वच बाबतीत नेमाडेंची टीका डोळ्यात झणझणीत अंजन घालून जाते. 
खंडेराव शेवटच्या भाषणात एके ठिकाणी म्हणतो,

प्रेम, माया, सहजीवन ही मूल्य ह्या कर्कश आधुनिक विचारशक्तीला तुच्छ वाटतात. त्यामुळे अडीच तीन हजार वर्षात पुन्हा गौतम बुद्धासारखा मानव जन्मत नाही. हे ह्या उत्क्रांतीचे अपयश आहे. 

नेमाडेंचा हा विचार समजून घेण्यासाठी 'हिंदू' एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचायला हवी. तीनशे चारशे वर्षांनंतर जेव्हा आताच्या हिंदुस्तानचा इतिहास लिहला जाईल तेव्हा भालचंद्र नेमाडे यांनी 'हिंदू' ही कादंबरी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जाईल, इतकी ती शाश्वत आणि सदैव टिकणारी आहे. 

धन्यवाद

#सत्यशामबंधू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा