उदाहरणार्थ कोसला वगैरे....

उदाहरणार्थ कोसला वगैरे… 

चेवानं लिहिण्याच्या झपाट्यात आपल्याला मिळेल ते रिचवत समोर येईल त्याला वेढत बुडवत उचलत लोटत नदीसारखं पुढेच जात राहिलं की आपोआप त्या त्या मजकुराची अंगची  शैली तयार होते…

कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत नेमाडे कोसला काय झपाट्यानं लिहला हे सांगताना वरील उद्गार काढतात. १९६३ साली वयाच्या २५व्या वर्षी नेमाडेंनी कोसलाला जन्माला घातलं.  ही मराठीतील नुसती क्रांतीच नव्हती तर मराठीवर नेमाडेंनी केलेले अनंत उपकार होते. होय उपकारच होते… तो काळ लघुकथांचा होता. अनेक सुमार दर्जाच्या लघुकथा ह्याच काळात मराठीत धुमाकूळ घालत होत्या. आता हे नेमाडेंचं निरीक्षण.. आणि ते तितकं खरं ही आहे. भाषेतील तोच तो गुळगुळीतपणा नेमाडेंनी पहिल्या प्रथम खरखरीत करून टाकला. तो कोसलाच्या रूपाने… कोसलाचा शब्दनशब्द नेमाडेंची बंडखोरीचं दाखवून देतो. तसा महाराष्ट्रला बंडखोरीचा मोठा इतिहास लाभलेला आहे. चक्रधर स्वामी आणि माउलींनी सुरू केलेली ही गंगोत्री वाहत वाहत आणि विस्तारत नेमाडेंच्या पर्यंत येऊन ठेवते आणि पुढे  जातही  ही राहते. हे नेमाडेंच थोरपण… ते मी काय वर्णावं…

….

मागच्या वर्षी कधीतरी तुळापुरात महाराजांच्या समाधी स्थळावर गेलो होतो. विकास, विशाल आणि मी. दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तिथे एक पुस्तकांचा स्टॉल होता. अर्थात मी आणि विकास तिकडे वळलो. विशाल काहीतरी पाहत बसला. स्टॉल वर गेलो. अर्थात सगळी पुस्तक धूळ खात पडली होती. कोसलाने लक्ष वेधलं. ३०० च पुस्तक त्यानेच २७० ला देऊन टाकलं. बर वाटलं, घसाघीस केलेली मलाही आवडत नाही. घेतलं आणि घरी आलो. मग बराच दिवस कोसला माझ्याकडे पडून राहिला. मग एक दिवस ठरवून वाचायला घेतला आणि हळू हळू करत वाचून काढला.  माझं सगळंच संथ असतं त्यामुळे कोसला ही संथपणे वाचला.  अर्थात हा कोसलाचा मला नंतर अपमान वाटला. पण ठीक आहे म्हंटल.. तस पाहायला गेलं तर कोसला मी खूप उशिरा वाचला. इतका उशिरा कोसला वाचणं म्हणजे ते वाचकांनी (अर्थात माझ्यासारख्या) स्वतःच दारिद्र्य मानायला हवं. वाचणाऱ्या प्रत्येकाने कोसला नुसता नजरेखालून नाही तर मना खाली घालून काढायला हवा. तसा तो नुसता नजरेखाली घालून चालणार ही नाही. त्याला मनाच्या पटलावर उतरवावं लागतं, स्वतःत बंडखोरी निर्मावी लागते. हे असच का..? म्हणून स्वतःलाच रोखठोक प्रश्न विचारावे लागतात.. तेव्हा कोसला समजतो, आपल्यात उतरतो… 

…..

ही कथा म्हणे भालचंद्र नेमाडे या प्रखर माणसाच आयुष्यच.. ते स्वतः पांडुरंग सांगवीकर ह्या नायकाच्या रुपात आपल्या समोर ठाण मांडून बसतात आणि स्वतःच्या आयुष्यातील अनेक बारीकसारीक प्रसंग  आपल्याला सांगतात.. सांगतात कसले प्रश्न उपस्थित करतात. निरर्थक जीवनाविषयी आणि भंपक समाजव्यवस्थे विरोधातील हे प्रश्न आपल्याला ही विचार करायला भाग पडतात. आपली परंपरा आणि दिले जाणारे ज्ञान हे निरर्थक आणि अर्थशून्य आहे. हे पटवून देण्यात पांडुरंग यशस्वी होतो. आधुनिकतेच वारं वाहायला लागलं होतं तेव्हा पांडुरंगचा जन्म सांगवी या सातपुड्याच्या पायथ्याशी रूढ आर्थने मागास असलेल्या खेड्यात झाला. लहान पणा पासून वडलांचं आणि याच कधी पटलचं नाही. एकुलता एक  आणि पाठी तीन बहिणी असल्याने वडील याला उगाच वंशाचा दिवा म्हणून पोसत होते. हे याला अजिबात पटत नसे. तो तस बोलून दाखवयाचा. वडलांच प्रेम स्वार्थी आणि एकुलता एक म्हणून… बाकी आई त्यातल्या त्यात बरी पण कधी कधी तिच्याही प्रेमाचा याला वीट यायचा. आजी वडलांसारखी.. थोडीशी खाष्ट.. 

पुढे कॉलेज साठी पांडुरंग पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतो. त्याच व्यक्तिमत्त्व फुलतं बहरतं ते इथेच.. इचलकरंजीकर, सुरेश, मधू, देशमुख, काळ्या असे अनेक मित्र त्याला इथे प्रत्येक टप्प्यावर भेटत जातात. नव्या जुन्यांची येजा सुरू असते. काहीं येतात- जातात-राहतात-परत-येतात… यातील अनेकांबरोबर तो शेवटी शेवटी भांडतो. त्यामुळे रूढ अर्थाने पांडुरंग सांगवीकर माणूसघाण्याच ठरतो. कारण झालेली भांडण तो स्वतःहून सोडवायला ही जात नाही आणि कोणी आलं तर हे तू मला का सांगत आहेस अस म्हणून त्याला हाकलून ही देतो. 
कॉलेज मध्ये चमकण्यासाठी तो बरेच नको ते प्रयत्न करतो. कॉलेज ची निवडणूक लढतो वगैरे, हॉस्टेलच्या मेस चा हिशोब ठेवतो वगैरे, वादविवाद आयोजित करतो वगैरे, कॉलेजमध्ये गॅदरिंगच नियोजन करतो वगैरे, त्यात हिशोबात घोळ होतो वगैरे, मग त्याच्यावर पैसे लांबवल्याचा आरोप होतो वगैरे, खिशातून पैसे टाकून त्या प्रकारणातून बाहेर येतो वगैरे, मग अभ्यास वगैरे- होत काहीच नाही मग घरी येतो. लोकांचे टोमणे- एवढं शिकून पोरगं पुण्याहून परत गुर वळायला गावी आलं-मग काय- मग यांची परत पुण्याला रवानगी… परत अभास-डायरी लिहणं- काहीच घडत नाही परत गावी- गावातील लोक-सगळं सगळं व्यवस्थित- सत्य-वास्तव मांडत कादंबरी संपते. 

वर वर पाहता कादंबरी समजणारच नाही. त्यात काही विशेष वाटणारच नाही. पण त्या मागील विचार समजून घेतला की कादंबरीचा आवाका लक्षात येतो. 

…..

नेमाडेंची भाषा शैली ही मुळात त्यांची ओळख. कुणाचीही भीडभाड न ठेवता, कुणाच्याही मोठेपणाची मिजास न ठेवता ते लिहितात. पांडुरंग सांगीवकर ज्या ताकदीने ते उभे करतात त्या मागचं गमक इथे समजून घेणं महत्त्वाच आहे. सडेतोड आणि रोखठोक भाषा. ऐन विसीतील तरण्याबांड पोरांचा खरा खरा परखड संवाद. पांडुरंगच्या मनातला प्रत्येक वाक्यागणिक जाणवणारा प्रचंड गोंधळ समाजाने घालून दिलेली समाजव्यवस्था किती कुचकामी आणि किती भंपक आहे हेच सांगून जातो. 
पांडुरंग सांगवीकर हा चंचल वाटतो. अनेक गोष्टी त्याच्या हातात असूनही तो परिस्थिती सांभाळू शकत नाही अस वाटत. पण पांडुरंग सांगवीकर हा काही आदर्श घ्यावा असा नायक नाही. त्यामुळे अशा अपेक्षा त्याच्या कडून ठेवण निव्वळ चूक. तो आयुष्यात रूढ अर्थाने अयशस्वी झालेल्या लाखो तरुणांचा प्रतिनिधी म्हणून कादंबरीचं नायकत्व स्वीकारतो. त्या प्रकारचं अपयश आपणही कधी तरी अनुभवलेलं असतं म्हणून पांडुरंग सांगवीकर आपल्यातीलच वाटतो.  मुळात यशस्वी होणं म्हणजे काय…? हे समजून घेतलं की मग पांडुरंग सांगवीकर आणि त्याची तडफड कळते आणि त्याची बंडखोरी उमगते.
जन्माला यावं.. मर मर शिकावं.. कुठे तरी नोकरीला लागून आई बापच पांग फेडावं.. लग्न करून जोडीदाराला सुख देण्यासाठी धडपड करावी... पोरं काढावी…त्यांना पोसावं… म्हातारं व्हावं आणि असंच कधीतरी मरावं हे असलं जीवन यशस्वी असलं तरी सुद्धा पांडुरंग सांगवीकरला नकोय.  
बऱ्याचदा आपण ही तेच करत असतो जे आपल्याला करायचं नसतं. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण कधीच नसतो. समाजाने आणि घरादाराने घालून दिलेल्या फुटकळ आदर्शवादावर आपली जगण्याची धडपड सुरू असते. पांडुरंग सांगवीकर इथेच बंडखोर होतो आणि ससेहोलपट सहन करून लढत राहतो…

…..

पांडुरंग सांगवीकर कसाही असला तरी त्याचे स्त्रियांविषयी असलेले विचार मात्र उच्च वाटतात. प्रेमाविषयी तो हळवा वाटतो. रमी वर असलेलं प्रेम जाणवतं आणि रमीचंही प्रेम जाणवतं पण नेमाडे त्या प्रकारात फारच कमी खेळतात. पण जितके खेळतात तितक्या वरून बरच काही समजतं.  रमी आणि पांडुरंग सांगवीकर यांची शेवटची भेट वाचनीय झालेली आहे. 
शेवटच्या भेटीत रमीकडे पाहता पाहता पांडुरंग सांगवीकर मनात विचार करतो, "समजा, रमीनं आता विचारलं-- आपण घर करू. तर ? तर मी निरुत्तर. आपल्या हाताशी काहीच लागत नाही. चांगलं तर नाहीच नाही."
 यातून रमी बद्दल असलेला आदर  जाणवतो.

पांडुरंग सांगवीकरची सर्वांत लहान बहीण मनी. ती देवीच्या रोगाने मरण पावते. हे पांडुरंगला पुण्याला आई पत्र पाठवून नंतर सांगते. त्याला प्रचंड धक्का बसतो. त्यावेळचा प्रसंग नेमाडेंनी इतक्या ताकदीने लिहला आहे की त्याला तोड नाही. नेमाड्यांचे शद्ब काळजाला लागून जातात, घरं पडतात  आणि आपल्या ही डोळ्यात चटकन पाणी उभं राहतं. प्रचंड रागाने लालेलाल झालेल्या पांडुरंग सांगवीकरची आपल्याला दयाच येते.
पुस्तकाच मुखपृष्ठ याच प्रसंगावर आधारलेलं आहे.

हे सगळे प्रसंग निव्वळ वाचनीय झालेले आहे.

….

अशा कादंबरींना शेवट नसतो. कोसला सुद्धा संपत नाही. जो पर्यंत वाचक म्हणून आपल्यातला पांडुरंग सांगवीकर जिवंत आहे तोपर्यंत कोसला संपत नाही, संपू शकत नाही. बरा वाईट असा कुठलाही शेवट कादंबरीला नाही. कोषातून बाहेर पडण्याची धडपड जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत पांडुरंग सांगवीकर आपल्यला प्रत्येक टप्प्यावर भेटत राहणार. कधी दुसऱ्यात तरी कधी आपल्यात. त्याच क्षणी चवताळून उठता यायला हवं. स्वतःच्या भोवती असलेला कोसला तोडून बाहेर येता यायला हवं. कोसलातून काय शिकावं…? तर एवढंच…! 

'आपापली वर्ष पुढे अचूक शिल्लक असतातच.' असे शेवटी लिहून भालचंद्र नेमाडे कोसलाला पूर्णविराम देतात. पुढे वाचकांच्या हाती सोपवून ते मोकळे होतात. 

प्रस्तावनेत नेमाडे कोसलाला उद्देशून एक अपुरी कविता लिहितात. तिचा शेवट असा आहे, 

"कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्या बरोबरच सती जातात,
तु मात्र मला पुरून उर.."

मला विश्वास आहे, कोसला फक्त नेमाडेंनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला आणि मराठी साहित्य विश्वाला पुरून उरेल…


------
शुभम संदीप सोनवणे
पुणे (दि. २०/०४/२०२१)
#सत्यशामबंधू

टिप्पण्या

Rutuja म्हणाले…
उदाहरणार्थ हे फारंच छान झालं..👌😍

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा