डायरी ऑफ अॅन फ्रँक : माझ्या नजरेतून


अॅन फ्रँकच्या डायरी विषयी....

शाळेत- कॉलेज मध्ये असताना उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तशा सध्या कोरोनाच्या सुट्ट्या आपण सगळेच जण उपभोगत आहोत. मी जरी विनोदाने हे म्हणत असलो तरी प्रकरण काही विनोदाने घेण्या जोगे नाहीये. जागतिक माहामारी म्हणून सध्या ह्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. तेव्हा आपणही काळजी घेऊन घरातच बसायला हवं आणि प्रशासनाला सहकार्य करायला हवं.
परंतु हे घरात बसने काही सोप्प काम नाही. माणसाला सतत काही ना काही करमणूक हवीच असते. तसा माणूसही थोडा विचित्रच प्राणी आहे. अर्थातच त्याला मीही काही अपवाद नाहीये बर.... जेव्हा खूप काम असत तेव्हा तो म्हणतो वेळ मिळत नाही आणि आता वेळच वेळ आहे तर म्हणतो वेळ जात नाही. घरात इनमीन पाच माणसं आहेत आमच्या. आता प्रत्येक जण करून करून किती करमणूक करणार. बर सासू सुनांची भांडण ठरलेलीच आहे. ती कुठल्याही युगात आणि कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतात. त्याने माझी करमणूक होते पण त्यालाही काही सीमा आहेच ना.. आता वडिलांकडून करमणुकीची अपेक्षा करणे म्हणजे महाकठीण काम.
टीव्ही पाहता पाहता ते विचारतात,
'हे कोरोनाचं प्रकरण वाढत चाललंय...?'
'हो ना..' मी
'हा सगळा त्या चीनचा उद्योग' ते
'हो ना..' मी
'सगळ्यांनी घरात बसायला हवं' असं म्हणून ते घराबाहेर जातात.
मी त्यांच्या कडे पाहत म्हणतो, 'हो ना..'

सुसंवाद इथेच संपतो. मला नाय वाटत याने कुणाची करमणूक झाली असेल. माझीच नाय झाली तर तुमची काय होणार घं**.

परंतु वेळ घालवायचा असेल आणि तो जर चागला घालवायचा असेल तर वाचन का एक खूप चांगला पर्याय आहे. माझ्याकडे तशी बऱ्यापैकी पुस्तके आहेत. त्यातली काही पुस्तके मी वाचली आहेत त्यामुळे राहिलेली पुस्तके आता अनासाये वेळ मिळालाच आहे तर वाचून काढू अस मी ठरवलं आहे. 

तारीख २८ मार्च, २०२०...

सकाळचे सगळे विधी उरकून आता काय वाचावे याचा विचार करत बसलो होतो. तेवढ्यात बाहेरून नानीचा(आज्जी) आवाज आला, "तुझं मित्र आल्यात" मी बाहेर गेलो.  ती'कडे पाहत मी मित्राला सामोरा गेलो. तो सोमनाथ होता. त्याला एक भारी पुस्तके वाचायचा नाद. माझ्याकडून तो कायम पुस्तके घेऊन जात असतो. तसा त्या दिवशी पण आला. मी त्याला वपुंची आणि प्रबोधनकारांची काही पुस्तके दिली. पण या वेळी त्याने माझ्या साठी एक पुस्तक आणलं होतं.

"डायरी ऑफ अॅन फ्रँक"




जर्मनीत जन्मलेल्या आणि नाझींच्या अमानवीय अत्याचारांना बळी गेलेल्या अॅन फ्रँक नावाच्या १३ वर्षाच्या स्वच्छंदी आणि भविष्याविषयी प्रचंड आशावादी असलेल्या मुलीची ही डायरी.
या डायरीमध्ये ती १२,जून-१९४२ ते ०१, ऑगस्ट-१९४४ दरम्यान तिला आलेल्या प्रत्येक अनुभवांची नोंद करते.
दुसरं महायुद्ध, हिटलरची अमानवीय राजवट, घर सोडून कुटुंबासह तब्बल दोन वर्षे अज्ञातवासात जाऊन राहणं, खाणे-पिणे आणि राहण्याची प्रचंड गैरसोय अशा वातावरणात सतत आनंदाचा शोध घेत राहणं सगळंच किती अवघड होतं. या परिस्थितीचा आपण विचारही करू शकत नाही.
दोन दिवसात हे पुस्तक वाचून काढलं. मन प्रचंड अस्वस्थ झालं. अॅन फ्रँक हिने मांडलेल्या शब्दांच्या मी प्रेमात पडलो होतो आणि त्याच वेळी तिने मांडलेल्या ऐकून भयावह परिस्थितीने मी प्रचंड हादरून गेलो होतो.

त्यानंतर मनात आलं ही अस्वस्थता घालवायची असेल तर आपणही या पुस्तकावर काहीतरी लिहू. एक गोष्ट मी मनापासून स्पष्ट करतो, अॅन फ्रँकच्या डायरीवर केलेली ही समीक्षा नाही आणि तेवढी माझी लायकी ही नाही. मला वाटलं हे पुस्तक तुम्ही वाचावं, अधिक सक्षम व्हावं म्हणून हा लेख प्रपंच.........


अॅन फ्रँक विषयी....

जन्म: १२-जून-१९२९
ठिकाण: जर्मनीतील फ्रँकफर्ट या गावी.
वडील: ओटो फ्रँक
आई: एडिथ फ्रँक
बहीण: मारगॉट फ्रँक



अॅन चे वडील एका कंपनीचे मॅनेजर होते. त्यामुळे त्यांच्या घरात सर्व सुखांची ये जा होती. १३ वर्षाची अॅन आपल्या वडिलांवर खूप प्रेम करायची. वडिलांना आदर्श मानायची.
तिच्या तेराव्या वाढदिवसाला तिला ही डायरी भेट म्ह्णून मिळाली. त्या डायरीला तिने 'किटी' असे नाव दिले होते.
त्या डायरीत ती स्वतःची मते अत्यंत स्पष्टपणे आणि बेधडक पणे व्यक्त करते.

शाळेतील मित्र-मैत्रिणी, शाळेतील शिक्षक, स्वतःचे आई वडील, बहीण, तिच्या आयुष्यात येणारी इतर माणसे, प्रेम, स्वतःतील शारीरिक आणि मानसिक बदल, स्वतःचे भविष्य, सेक्स, हिटलर, दुसरे महायुद्ध, ज्यू धर्मीयांचे हाल, राजकारण आणि नातेसंबंध याविषयी अॅन अत्यंत परखडपणे व्यक्त होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने नेदरलँड वर कब्जा करेपर्यंत फ्रॅंक कुटुंब नेदरलँड मधेच होते. त्यानंतर त्यांना ते ज्यू धर्मीय असल्याकारणाने हिटलरच्या अमानवीय अत्याचारांपासून वाचण्यासाठी स्वतःच घर सोडावं लागतं. ओटो फ्रँक यांच्या कार्यालयातील तळघरात ते आश्रय घेतात. त्यांच्या बरोबर त्यांचं स्वतःच फ्रँक कुटुंब धरून आणखीन चार जण वास्तव्यास होते.

त्या अज्ञातवासात तब्बल दोन वर्षे ते आठ जण भूमिगत होतात. जगाशी त्यांचा कसलाही संपर्क राहत नाही. त्यादरम्यान अॅनला आलेले अनुभव कधी हसवतात, कधी रडवतात, कधी किळस आणतात, कधी विचार करायला भाग पाडतात. बऱ्याच वेळेला हे अनुभव तिच्याच वाट्याला का आले असावेत या विचाराने आपल्याच डोळ्यात पाणी येत.
(हे सर्व अनुभव मी पुढे नमुने दाखल दिलेले आहेत.)

१-ऑगस्ट-१९४४ रोजी अॅनने या डायरीवर शेवटचे शब्द लिहिले. त्यांनतर त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांनी निर्वासित छावणी मध्ये आश्रय घेतला. तिथल्या अस्वच्छतेमुळे तिथे १९४५ च्या दरम्यान टायफॉईड पसरला त्यातच अॅन फ्रँक आणि तिची बहीण गतप्राण झाली. या सर्वांमध्ये अॅनचे वडील तेवढे वाचले. पुढे त्यांना ही डायरी मिळाली. आणि १९४७ साली त्यांनी ह्या डायरीला सुधारित करून प्रकाशित केले. १९५२ मध्ये डच भाषेत लिहिलेली ही डायरी 'The Dairy of a Young Girl' या नावाने पहिल्यादा इंग्लिश मध्ये भाषांतरित झाली. त्यानंतर जगभरातील अनेक भाषेत या डायरीचे अनुवाद प्रसिद्ध झाले. मराठी मध्ये 'डायरी ऑफ अॅन फ्रँक' या नावाने हे पुस्तक लेखिका मंगला निगुडकर यांनी भाषांतरित केलेले आहे तर या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग होऊस यांनी केले आहे.

या डायरीवर आता पर्यंत अनेक नाटके आणि सिनेमे तयार झालेले आहेत. माझ्या या लेखात वापरलेली सर्व छायाचित्रे याच चित्रपटांतील आहेत.

एक गोष्ट वाचकांनी मात्र लक्षात घ्यायला हवी. वयाच्या १३ ते १५ वर्षाच्या काळात अॅनने लिहिलेली ही डायरी आज एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून गणली जाते. तिला मोठे होऊन लेखिका आणि पत्रकार व्हायचं होतं पण या डायरीव्यतिरिक ती अधिक लिहू शकली नाही. परंतु ही डायरी लिहून तिने जागतील साहित्य क्षेत्रात स्वतःच्या लेखन कलेचा अमिट असा ठसा उमटवीला आहे.  तिच्या या लेखन कलेविषयी ती एका ठिकाणी छान लिहिते,

"मला मृत्यूनंतर ही जगायचे आहे आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे."

तिची डायरी वाचली की असंच म्हणवस वाटतं की, ती मृत्यूनंतर ही जगली आणि अमरही झाली......

----------

शाळेतील अॅन....

या डायरीमध्ये अॅन शाळे विषयी, मित्र मैत्रिणींविषयी, शाळेतील गमतींविषयी भरभरून लिहिते. तिथेही ती कसलाही आडपडदा वापरत नाही.
१४-जून-१९४२ रोजी किटीला लिहिलेल्या दुसऱ्याच पत्रात ती शाळेतील मुलामुलींविषयी भरभरून लिहिते. बऱ्याच जणांना नावे ठेवते. तेव्हा तिच्यातील इनोसन्स आणि खरेपणा आपल्याला जाणवतो.
तेराव्या वर्षाच्या अॅनला वाचनाची भारी आवड आहे. 'डच विरकथा आणि आख्यायिका' या पुस्तकाचा मैत्रिणींकडून तिला दुसरा खंड भेट म्हणून मिळतो ती त्या पुस्तकाचा पहिला खंड विकत घेऊन दोन्ही खंड वाचून काढते.
डायरीमध्ये बऱ्याच मुलांची मुलींची खरी नावे न वापरता ती मनात येईल ती आध्यक्षरे वापरते.
त्यामुळे डी. क्यू., इ.येस., जे.आर. अशी मुलींची नावे आपल्या वाचनात येतात.

आता तिच्याच शब्दांत काही वर्णने वाचा...

तिची मैत्रीण हँनेली विषयी ती काय लिहिते ते पहा:

हँनेली गॉस्लर (हिला शाळेत लिस म्हणून ओळखतात) जरा विचित्र स्वभावाची आहे. घरी स्पष्टवक्तेपणाने, धीटपणाने बोलते, पण इतरांशी बोलताना बुजरी आहे. तुम्ही तिच्याशी जे काय बोलाल ते सगळे घरी जाऊन आईला सांगते. पण जे खरे वाटेल तेच बोलते.अलीकडे ती मला खूप आवडायला लागलेली आहे.

आता तिच्याच वर्गातल्या एका मुलाविषयी काय लिहिते पहा:

रॉब कॉहेन माझ्या प्रेमात पडला होता. पण मला तो मुळीच आवडत नाही. तो एक दुतोंडया, खोटारडा, स्वतःला फार शहाणा समजणारा मुलगा आहे. चीड येते मला त्याची.

अशीच इतर मुलामुलींविषयी वर्णनं वाचली की अॅनच्या तल्लख विनोद बुद्धीची आपल्याला खात्री पटते.

अॅनचा स्वभाव बडबडा असल्याने एक शिक्षक तिच्यावर बरेच रागावतात आणि तिला काही निबंध लिहून आणायला सांगतात. मुळात त्या निबंधाचे विषय ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. विषय होते- 'वायफळ वटवट', 'न सुधारू शकणारी बडबड मावशी'  तिसऱ्या विषयाने तर कहर केला...
'बदक मावशी करते क्वँक,क्वँक,क्वँक' साला आता या विषयांवर काय लिहायचं.

'मी मुख्यमंत्री झालो तर...' हा विषय जेव्हा मला निबंध लिहायला म्हणून मिळाला तेव्हा गटारे मी कशी सुशोभित करेन याच्या वर्णना पलीकडे माझी वैचारिक पातळी धावली नाही. आणि म्हणूनच अॅनचे मला कौतुक वाटले कारण वरील सर्व विषयावर तिने निबंध लिहिले. त्या 'बदक मावशी...' च्या ऐवजी तिने एक कविता सादर केली ती ऐकून रागवणारे शिक्षक तिच्यावर प्रेम करू लागले असे ती आनंदाने लिहिते.

वरवर हे सगळं छान वाटत असलं तरी तस नव्हतं. अॅन ज्यू असल्याने त्यांना वेगळ्या शाळा होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. या विषयी अॅन लिहिते तेव्हा त्या काळातील सामाजिक असमतोल किती भयानक होता याची जाणीव होते.

काही काळातच दुसरे महायुद्ध सुरू होते.आणि फ्रँक कुटुंबाला अज्ञातवासात जावं लागतं. समजा जर अशी वेळ आपल्यावर आली आणि अज्ञातवासात जावं लागलं तर आपली सर्वांची प्राथमिक गरज  काय असेल...? अन्न, वस्त्र आणि निवारा... बरोबर ना...?
परंतु फ्रँक कुटुंब थोडं वेगळं भावलं मला. वरील तीन गरजांबरोबर शिक्षण ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने प्राथमिक गरजच होती. त्यामुळे अॅन आणि तिच्या बहिणीचं शिक्षण अज्ञातवासात ही सुरू राहील याची काळजी त्यांच्या वडिलांनी घेतली होती. चोरबाजारातून यांना मदत करणाऱ्या व्यक्ती त्यांना अनेक पुस्तके आणि मासिके आणून द्यायची आणि यातूनच त्या दोघी शिकायच्या.

याच अज्ञातवासात अॅनने फ्रेंच, इंग्लिश, जर्मन आणि डच या भाषा शिकण्याचा सपाटा लावला होता. याच बरोबर भूमिती, बीजगणित, इतिहास, पुराणे, जीवशास्त्र, बायबल, डच साहित्यकृती यांचाही ती अभ्यास करते.. वाचकांनी एक लक्षात घ्यायला हवं की अॅन ही १३ते १४ वर्षांची मुलगी आहे आणि तीची समज आपल्या पेक्षा कैक पटीने पुढची होती. म्हणून अॅन मला भावली.

---------

अॅन आणि अज्ञातवासातील इतर व्यक्ती:

मी आधीच सांगितले की या अज्ञातवासात फ्रँक कुटुंबा बरोबर इतर चार जण सुद्धा होते. हे सर्व जण अॅनच्या डायरीत अॅनने व्यवस्थित उतरवले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अत्यंत बारीक स्वभाव वैशिष्ट्यांचा उहापोह अॅन आपल्या या डायरीत करते.
तिची व्यक्ती निरीक्षण करण्याची हातोटी विलक्षण आणि अफलातून होती. त्यामुळे तिने केलेल्या व्यक्ती वर्णनावरून सदर व्यक्ती आपल्या नजरे समोर कधी अवतरले हे आपले आपल्यालाच कळत नाही. त्याच बरोबर या सर्वांना बाहेरून मदत करणाऱ्या सुद्धा काही व्यक्ती असतात. त्यांच्याविषयी ती अत्यंत कृतज्ञ असल्याचे वारंवार सांगत असते. देवाकडे ती कायम या सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना करत असते.

फ्रँक कुटुंबा व्यतिरिक्त अज्ञातवासात राहणाऱ्या इतर व्यक्तींची नावे (कंसात लिहिलेली नावे अॅनने वापरलेली नावे आहेत):

१) श्री हरमान व्हॅन पेल्स (हॅन्स व्हॅन डॅन)
२) सौ ऑगष्टा व्हॅन पेल्स ( पेट्रोनेला व्हॅन डॅन)
३) पीटर व्हॅन पेल्स ( पीटर व्हॅन डॅन)
४) फ्रिट्झ फेकर (अलबर्ट डसेल)

या व्यतिरक त्यांना बाहेरून मदत करणाऱ्यांमध्ये:

व्हिक्टर कुगलर , जोहॅन्स क्लिमन, मिएप गाईज, एलिझाबेथ(बेप) व्हॅस्कुजिल् आणि इतर अनेक चागली माणसे असतात. या सर्वांना अॅन कायम धन्यवाद देत असते.



श्री व सौ व्हॅन डॅन यांच्यात कायम छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होत असतात. त्यात त्यांचा मुलगा पीटर व्हॅन डॅन याची मात्र परवड होत असते. त्याची अॅनला भलतीच दया येत असते. या दयेचं कधी प्रेमात रूपांतर होतं तीच तिला कळत नाही.( त्याविषयी मी पुढे लिहल आहे.)

अलबर्ट डसेल (वय जवळजवळ पन्नाशी पार) हा व्यक्ती या सर्वांना नंतर जॉईन होतो. तो डेंटिस्ट होता. सर्वानुमते त्याला अॅनच्या रूम मध्ये राहण्यास सांगितलं जातं. पुढे जाऊन या व्यक्तीचा अॅनला त्रासच होतो. तिचा एकांत डसेल मुळे हरवला जातो.

सौ व्हॅन डॅन आणि डसेल या दोघांमुळे अॅनच्या विनोद बुद्धीला चालनाच मिळते. तिच्या डायरी मध्ये या दोघांविषयी अॅन भरपूर विनोदी बाजाने लिहिते. परंतु अॅनला नेहमी घालून पाडून बोलण्यात हेच दोघे पुढे असतात त्यामुळे अॅनला हे दोघे जास्त आवडत नसतात. पण पुढे जाऊन सौ व्हॅन डॅन विषयी अॅनचं मत काहीस बदलतं.

अॅनचं तिच्या आई विषयी जास्त चांगलं मत नव्हते. तिची आई तिला समजून घेत नाही असं तिला सारख वाटत असतं. बऱ्याच वेळा वयात येणाऱ्या मुलींचं आपल्या आयांबरोबर पटतच नसतं. त्याला अॅन सुद्धा अपवाद नाही.

अॅन एके ठिकाणी लिहिते, ' ममीच्या मृत्यूचा विचार मी सहजपणे करू शकते पण डॅडींच्या मृत्यूची कल्पनाही मला सहन करता येत नाही. मी असे लिहिणे फार क्षुद्रपणाचे आहे हे समजते मला. पण काय करू? सत्य तेच मी लिहिले आहे. ममीने मी लिहिलेले हे कधीच वाचू नये अशी माझी तीव्र इच्छा आहे.' (पत्र दि. ३-ऑक्टोबर-१९४२)

परखड पणे स्वतःचे विचार व्यक्त करणारी अॅन आपल्या वाडीलांविषयी आणि बहिणी विषयी सुद्धा भरभरून लिहिते. पीटर वर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपली लेखणी खर्ची घालते. या सगळ्यातून खरी अॅन फ्रँक आपल्या समोर उभी राहते.  नातेसंबंध, भाव भावना, प्रेम याविषयी अॅनने मांडलेली मते एका मोठ्या तत्वज्ञाना प्रमाणे वाटतात. वाचकांनी ती मते वाचून समजून उमजून घ्यावीत असा माझा आग्रह असेल.

----------

अॅन फ्रँक : भावभावना

अॅन फ्रँक ही एक भावना प्रधान मुलगी होती. ती संवेदनशील होती. प्रत्येक नात्याच्या बाबतीत, भावनेच्या बाबतीत तिची परखड मते होती. छोट्या छोट्या गोष्टीच सुद्धा तिला दुःख होतं असे. ते सगळं ती या डायरीत लिहीत असे.

तिला लहान, खुळचट अस म्हंटलेलं आवडत नसे. त्यामुळे तिला राग सुद्धा येत असे. मोठ्या मुलांनी वाचावयाची पुस्तके तिला वाचायला मिळत नसे. परंतु कालांतराने तिला 'इव्हाचे तारुण्य' हे पुस्तक वाचायची परवानगी मिळाली. ते वाचून झाल्यावर एके ठिकाणी ती लिहिते,'

इव्हा ऋतुमती झाल्याचेही त्यात लिहिले आहे. माझं ते केव्हा सुरू होईल याची मी वाट पाहत आहे.'

पुढे जाऊन एका पत्रात ती लिहिते, '

मला वाटते मी लवकरच बाहेरची बसायला लागणार आहे. तशी चिन्हे दिसताहेत. ममीलाही तेच वाटतंय.'
(२-नोव्हेंबर-१९४२ च्या पत्रातील ता.क.)

याच पत्राला २२-जानेवारी-१९४४  रोजी जोडणी देताना अॅन लिहिते,

' त्या तऱ्हेचा मजकूर परत माझ्याच्याने लिहवणार नाही. किती निष्पाप होते मी तेव्हा.'

अॅनच्या या निर्मळ भावना वाचकांनी समजून उमजून घ्यायला हव्या. अॅन मध्ये होत असलेले हे शाररिक आणि मानसिक बदल तिला आवडत असतात. या सगळ्याच वर्णन करताना ती वयात येणाऱ्या सर्व मुलींचं योग्य प्रतिनिधित्व करते अस मला वाटतं.

प्रेम ही अॅनची आवडती भावना. परंतु ती प्रेमा बाबत फारच सजग असते. उगा चांगला दिसला म्हणून आवडला असे तिचे विचार नाहीत. तिला शाळेत असताना पीटर शिफ नावाचा मुलगा आवडायचा. पण त्याचं काय जमलं नाय. पुढे अज्ञातवासात गेल्यावर पीटर व्हॅन डॅन तिच्या आयुष्यात नव्याने येतो. त्यांची मैत्री होते. तिला त्याचा सहवास आवडू लागतो. त्याच्या खोलीत जाऊन तासनतास गप्पा मारत बसने, खिडकीच्या छोट्याश्या फटीतून बाहेरच सुंदर आकाश न्याहाळत बसने. हे तिला प्रचंड आवडे. पुढे ते एकमेकांच्या प्रेमातही पडतात.

१६-एप्रिल-१९४४ रोजीच किटी ला लिहिलेलं अॅनचं पत्र निश्चितच वाचनीय आहे. त्या पत्रात ती १५-एप्रिल या दिवसा विषयी लिहिते. तो दिवस तिच्या आयुष्यातील फार सुंदर दिवस होता. याच दिवशी रात्री साडे नऊ वाजता काय घडलं या विषयी ती लिहिते,

'त्याबरोबर एकदम त्याने माझ्या गालाचे  व केसांचे चुंबन घेतले. मी एकदम खाली धावले. एकदाही मागे वळून न पाहता.'   हे संपूर्ण पत्र खूपच भावपूर्ण आहे.



(अॅनच्या आयुष्यात घडलेल्या या प्रसंगानंतर बरोब्बर ५० वर्षांनी माझा जन्म झाला. कुणाला कशाचा आनंद होईल काही सांगता येत नाय.मला मात्र या गोष्टीचा फार आनंद झाला. )

घडला प्रसंग अॅन पीटरला विश्वासात घेऊन वडिलांना सांगते. त्यानंतर यांच्या विषयी अज्ञातवासात बरीच चर्चा होते. श्री फ्रॅंक (अॅनचे वडील) तिला पीटर पासून थोडं दूर राहण्याचा सल्ला देतात. तो तिला पटत नाही. तिची बाजू ती वडिलांना एक पत्र लिहून मांडते. श्री फ्रॅंक त्यावर उत्तर देतात.
मुलगी आणि वडील यांच्यातील हा संवाद एक वाचक म्हणून आपल्याला खूप काही शिकवून जातो. अॅन स्वतःच्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहते आणि वडिलांचा ही अनादर होऊ देत नाही. या संबंध प्रवासातील अॅनची प्रत्येक टिपणं अधिक आधुनिक आणि पुढारलेली वाटतात आणि म्हणूनच ती भावतात ही...

अॅनचा देवा धर्मावर गाढा विश्वास होता. त्यामुळे ती दररोज प्रार्थना करत असते.  तिला तिच्या ज्यू धर्माचा अभिमान होता. ज्यू धर्मीयांवर वर होत असलेले अन्याय पाहून पीटर युद्ध संपले की धर्म बदलणार होता. हे तिला फारसं पटलं नव्हतं. अॅन ही खूपच भावना प्रधान आणि दुसऱ्याची काळजी वाहणारी होती आणि याचा प्रत्यय मला आला तो २७-नोव्हेंबर-१९४३ च पत्र वाचून. या पत्रात ती तिला पडलेल्या एका स्वप्ना विषयी लिहिते.  ते स्वप्न जरी असलं तरी त्या काळच्या प्रत्येक ज्यू धर्मियांची ती खरी परिस्थिती होती. हँनेली नावाची तिची मैत्रीण तिच्या स्वप्नात आलेली असते. आणि ती 'या नरकातून मला सोडव. मला तू मदत कर.' अशी विनवणी अॅनकडे करत असते. स्वप्न पाहून ती खडबडून जागी होते.स्वतःचा तिला राग येतो. 'कृपाळू देवा,परमेश्वरा तिला सुखी ठेव. एकाकी पडू देऊ नको.' अशी आर्त हाक ती देवाला घालते.
पत्राच्या शेवटी ती लिहिते,' ओ, हॅनेली, मला तू परत भेटशील का? भेटलीस तर माझ्याजवळ आहे त्यातले सगळे तुला देईन.' हे वाक्य वाचताना आपल्याही डोळ्यात आपसूकच पाणी तरळते.

सुख आणि दुःख याबाबतीत अॅनची मते स्पष्ट होती.
दुःखाला हरवायचं असेल तर तुम्हाला सुखी माणसांच्या सहवासात जायला हवं असं तीच स्पष्ट मत होतं. आपल्या दुःखा पेक्षा जगात अजूनही दुःखी माणसे आहेत तेव्हा त्यांच्याकडे पाहून आपलं दुःख किती क्षुद्र आहे असं समजून सुख मानण्याचा नाटकी पणा करणे तिला मुळीच मान्य नव्हते. एक दुःखी माणूस दुसऱ्याच दुःख हलकं करू शकतच नाही यावर तिचा ठाम विश्वास होता.

परंतु अस जरी असलं तरी , जर्मन्यांच्या आणि पर्यायाने हिटलरच्या छळगृहात डांबून मरण यातना भोगणाऱ्या लाखो ज्यू लोकांविषयी तिला कमालीची सहानुभूती होती. त्यांचं दुःख तिला मोठं वाटत होतं. अज्ञातवासातून बाहेर पडल्यानंतर याच लोकांच्या सेवेत उर्वरित आयुष्य खर्ची घालायचं अस एक स्वप्न ती बाळगून होती. त्यासाठी हे युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी ती देवाला प्रार्थना करत असे.

दुःख तर आयुष्यभर असणारच आहे. एवढ्या मरण यातना भोगत असतानाही ती सकारात्मक होती. एके ठिकाणी ती लिहिते,

' जोवर हा स्वच्छ सूर्यप्रकाश, हे निरभ्र आकाश दिसताहेत व त्या सौंदर्याचा मनमुराद आनंद मला लुटता येतोय,तोवर मी निराश,उदास काय म्हणून व्हायचं...?'
(पत्र दि. २३-फेब्रुवारी-१९४४)



सगळ्या भावनांना सहज आणि इतकाच सडेतोड स्पर्श करणारी अॅन सेक्स विषयी सुद्धा तितक्याच सहजतेने लिहिते. तीच लिखाण सहज असलं तरी मार्मिक आणि अंतर्मुख करणार आहे. मोठ्यांच्यात सेक्स विषयी चर्चा सुरू असते तेव्हा लहानग्यांना बाहेर काढलं जात हे तिला अजिबात आवडत नाही. त्या विषयी ती योग्य शब्दांत आपली नाराजी व्यक्त करते.

घरातून तिला सेक्स किंवा मासिक पाळी विषयी मिळालेली माहिती ही अत्यंत तोडकी असते. तिला अनेक प्रश्न पडलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरे ती स्वतः पुस्तकांमधून मिळवते. पण ती पुरेशी नसते हे तिला कळत असते. पीटर आणि ती स्वतः या विषयी अनेक वेळा स्पष्टपणे बोलतात. त्या दोघांचे सर्व संवाद ती कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिते. लैगिक शिक्षणाकडे आजही आपण एका अस्पृश्य नजरेने पाहत आहोत. आजच्या अति आधुनिक जगातही आपण या विषयावर कुटुंबात चर्चा करत नाही.  त्यामुळे आजचे तरूण बरीच माहिती बाहेरून स्वतःला मिळेल त्या मार्गाने मिळवतात.
तेव्हा आणि आजही याबाबतीत परिस्थिती सारखीच आहे. हे खेदाने म्हणवस वाटतं.

अॅन एके ठिकाणी लिहिते,

'आयांनी आपल्या मुलांना स्वतःच नीट सगळे समजावून सांगितले नाही तर मग त्यांना कानावर पडलेल्या बोलण्यातून अर्धवट माहिती मिळते आणि ती कधी नीट रीतसर नसते.' (पत्र दि. १८-मार्च-१९९४४)

अॅनचे विचार आजही तंतोतंत लागू पडतात.

-------

अॅन आणि राजकारण-समाजकारण:

भावभावना, प्रेम, कुटुंबातील आणि अज्ञातवासातील लोकांची एकमेकांशी होत असलेली भांडण याविषयी लिहीत असताना आपण राजकारण आणि सध्याची बाहेरील परिस्थिती याविषयी आपण जास्त लिहायला हवं असं तिला वाटत असतं. आणि ती लिहितेही.
डायरी वाचत असताना आपल्याला त्याचा पदोपदी अनुभव येते. त्याच्याकडे असलेल्या रेडिओ वर ती सर्व जण सारख्या बातम्या ऐकत असतात. इंग्लंड वरून प्रसारित होत असलेल्या बातम्या ऐकायच्या असा तिथे दंडक होता. कारण जर्मनीतून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर हिटलर चा अंकुश होता. त्यामुळे त्या बातम्या सरळ सरळ खोट्या असतं. ब्रिटिशांनी ते युद्ध जिंकावे असे त्या सर्वांना वाटे. त्याच कारण सुद्धा स्पष्ट होतं, जर्मनी च्या जुलमी राजवतीतून सुटून स्वातंत्र्य त्या सर्वांना हवं होतं. ही भावना जर्मनी च्या अत्याचाराने भरडलेल्या प्रत्येकाचीच होती.

हिटलर आणि त्याच्या ऐकून प्रचारकी धोरणावर ती सडकून टीका करते. हिटलर आपल्या जखमी सैनिकांशी रेडिओ वरून संवाद साधत असे. या कार्यक्रमा विषयी अॅन लिहिते,

' रेडिओ वरचा हा कार्यक्रम कळसूत्री बहुल्याच्या कार्यक्रमासारखा व केविलवाणा वाटत होता. जखमी शिपायांना म्हणे आपल्या जखमांचा अभिमान वाटत होता. त्यातल्या एका शिपायाला हिटलरशी हस्तांदोलन करायला मिळणे एवढे भाग्याचे वाटत होते की, तो अगदी गहिवरला होता. असल्या भंपक प्रचारावर कोणाचा विश्वास बसेल ?'



हिटलरच्या पाशवी अत्याचाराला कंटाळून फ्रॅंक कुटुंबाला भूमिगत व्हायला लागलेलं असतं. त्यांच्या सारख जिणं अनेकांच्या वाट्याला त्या वेळी आलं होतं. हिटलरच्या छळ छावण्या तर पृथ्वीवरचा नरकच होता. जनावरांना कोंडावे तशा पद्धतीने माणसं कोंडली जातं होती. ज्यू धर्म संपतो की काय अशी परिस्थिती होती. या सगळ्या प्रकाराला कंटाळून , त्रासून अॅन एके ठिकाणी लिहिते,

' मी ज्यू असो वा आणखी कुणी, पण मी एक तरुण मुलगी आहे आणि साधा सुधा आनंद , मजा एवढ्याची मला नितांत गरज आहे हे कुणाच्या ध्यानात येईल का...?' (पत्र दि. २४-डिसेंबर-१९४३)

असे अनेक प्रश्न विचारून अॅन त्या काळची भयानक परिस्थिती विशद करते. हिटलरला मदत करणाऱ्या ज्यू अधिकाऱ्यांविषयी सुद्धा ती परखड पणे लिहिते. ब्रिटिशांविषयी तिची मते सकारात्मक होती. आपल्याला या संकटातून ब्रिटिश बाहेर काढतील याची तिला खात्री होती. वाचकांनी इथे लक्षात घ्यायला हवं की, ब्रिटीशांनी जरी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं असलं आणि ते आपल्यासाठी खलनायक असले तरी अॅन सारख्या हजारो लोकांसाठी त्या युद्धादरम्यान ब्रिटिश देवदूतच होते. डायरी वाचताना आपणही या मताशी सहमत व्हाल.

अॅन अनेक बाबतीत वैचारिक दृष्ट्या फार विचारी होती. १३-१४ वर्ष वयाची असतानाही राजकारणा विषयी तिची मते ठाम आणि जागतिक दर्जाची होती. ती वाचून आपणही आवक होतो. विस्टन चर्चिल आणि इतर अनेक जागतिक नेत्यांच्या बद्दल ती स्वतःची ओघवती मते व्यक्त करते. गांधींचा सुद्धा ती थोडासा उल्लेख करते तेव्हा नाही म्हंटल तरी उर अभिमानाने भरून येतो. 

ब्रिटिशांबद्दल जरी तिची मते चांगली असली तरी तिला युद्ध काही मान्य नाही. कशासाठी ही युद्धे करायची..? असे अनेक प्रश्न सहज पणे पडतात परंतु त्याची उत्तरे सहज पणे देता येत नाय. ३-मे-१९४४ रोजीच्या पत्रातून ती जे रोखठोक प्रश्न विचारते त्याचा विचार फक्त राजकारण्यांनाच नव्हे सामान्य नागरिक म्हणून आपल्याला ही करावाच लागेल.
ती लिहिते,

' कशासाठी इंग्लंड अजस्त्र विमाने आणि बॉम्ब तयार करत आहे ? आणि त्याच वेळी नव्या तऱ्हेची मजबूत घरे बांधायचा विचार करत आहे ? गरिबांना, कलावंतांना, वैद्यकीय उपचाराकरिता मदत द्यायला पैसा नसतो पण युद्धा साठी, विध्वंसासाठी कोट्यवधी पैसे खर्चायला मात्र सरकार तयार असते. जगाच्या एका भागात अन्नाचे डोंगर कुजून वाया जात आहेत तर दुसऱ्या भागात माणसे भुकेने मारताहेत, अशी का ही माणसे वेड्यासारखी वागतात...?

आजच्या शतकातही या प्रश्नामध्ये काही बदल करावा असं मला वाटत नाही. आजही हे प्रश्न आपण महासत्ता असलेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येक देशाला विचारू शकतो. चौदा वर्षाच्या मुलीला जे समजलं ते आजही आपल्याला समजत नाही, हे अखिल मानवजातीचं अपयश मानायला हवं, अस माझं मत आहे.

--------

दुर्दैवी शेवट....

अज्ञातवासात राहताना फ्रॅंक आणि व्हॅन डॅन कुटुंबाला आलेल्या किळसवाण्या, भयानक, भीतीदायक प्रसंगाविषयी अॅन अगदी स्पष्ट पणे लिहिते. ते प्रसंग अंगावर काटा आणतात.. वाचायला नकोसे वाटतात... वाचकांनी ते स्वतः वाचावे. त्यातील भयानकता समजून घ्यावी. या पेक्षा वाईट परिस्थिती कोणती असूच शकत नाही याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाय. 

दि. १-ऑगस्ट-१९४४ रोजी अॅन आपल्या डायरीत किटी ला शेवटचे पत्र लिहिते. हे पत्र शेवटचे असेल असं तिला स्वतःला सुद्धा वाटलं नसेल. एका गोष्टीच मात्र राहून राहून आश्चर्य वाटते, कायम इतरांविषयी लिहिणारी अॅन शेवटी मात्र केवळ स्वतः विषयी लिहिते. स्वतःच्या गुण दोषांची चर्चा करते. 

ती लिहिते, ' माझ्या स्वभावातला कोमलपणा ,हळवेपणा, निसर्ग सौंदर्याची आवड लोकांना कळली तर ते माझी टिंगल करतील अशी मला भीती वाटते. मनातून मी फार भावनाप्रधान आहे. ती माझी बाजू प्रकाशात आली की लगेच लाजाळू च्या झाडाप्रमाणे पाने मिटून घेते.
म्हणूनच ती गुणी अॅन कुणाला दिसतच नाही. मी एकटी असताना ती प्रकट होते.'

हे सगळं वाचत असताना आता अॅन पकडली जाणार आहे हे वाचक म्हणून आपल्याला माहीत असतं म्हणून ही निर्वाणीचा भाषा आपल्याला ही सलते. काळजाला घर पाडते.

'मन खिन्न होते, उदास होते आणि शेवटी माझी द्वाड बाजू वर येते.' हे शेवटचे शब्द लिहून अॅन पेन ठवते तो कायमचाच.........

त्यानंतर त्या सर्वना पकडलं जातं. प्रत्येक जण कुठे ना कुठे त्रास असह्य झालेल्या मरण पावतो. अॅन आणि तिची बहीण मारगॉट ज्या ठिकाणी असतात त्या छळ गृहात प्रचंड अस्वच्छता असते. त्यामुळे तिथे टायफॉईड ची भयंकर साथ पसरते. त्यातच अॅन आणि तिची बहीण १९४५ च्या सुरवातीला कधीतरी मरण पावतात. त्यांचं मरण आणि त्याचा विचारही करावसा वाटत नाही. कायम दुसऱ्या च्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या या कोवळ्या, प्रेमळ आणि तितक्याच खऱ्या मुलीच्या मदतीला देव का येत नाही याचंच राहून राहून दुःख बोचत राहतं.


(छायाचित्रात दाखवलेल्या एखाद्या ठिकाणी तिला दफन केलं असावं.)

दुर्दैव पहा अॅनच्या मृत्यू नंतर थोड्याच दिवसात म्हणजे १२-एप्रिल-१९४५ मध्ये ब्रिटिशांकडून त्या छळ गृहातील लोकांची मुक्तता केली जाते. थोडे दिवस अॅन जिवंत राहिली असती तर जगाला एक महान लेखिका, पत्रकार, तत्वज्ञानी आणि समाजसेवीका मिळाली असती. परंतु अस जरी असलं तरी या डायरीच्या माध्यमातून अॅन जिवंत आहे, चिरंजीव आहे. तिने जगाला दिलेला हा अनमोल ठेवा जगाला कायम शांतताप्रिय राहायला मदत करेन, असा माझ्या मनात प्रचंड आशावाद आहे, तो ही अॅनमुळेच.........

समाप्त..!

शुभम संदीप सोनवणे.


               (अॅन फ्रँकची एक सुंदर लेखन मुद्रा...)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

उदाहरणार्थ कोसला वगैरे....