तिफणवाडी...!!

तिफणवाडी.......!!!


तिफणवाडी.... पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्थित असलेलं आमचं टुमदार गाव. भात शेती आणि दूध व्यवसाय हे आमच्या गावाचे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत. याशिवाय पुण्या मुंबईत अनेक जण स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे गावात तरुण जरा कमीच. भीमाशंकरच निसर्ग सौदर्य आमच्याही गावातून जातं. भीमा नदीवरील चास-कमान धरणाचा फुगवटा आमच्या गावाला येऊन भिडतो. त्यामुळे आमच्या गावातील जवळ जवळ सर्वच कुटुंबे धरणग्रस्त झालेली आहेत. आज इतकी वर्षे लोटली तरी आमचं पुनर्वसन होत आहे, आम्हाला जमिनी मिळता आहेत, आमचे प्रश्न सुटता आहेत.... सगळं थोतांड, दुसरं काय... 
असो...किती बोलणार आणि कुणाला सांगणार... ?

तस हे माझं गाव नाही. तिफणवाडी हे माझ्या मामाच गाव. लहानपणीच आई वडील गेल्याने मामाने मला मांडीवर घेतलं. मामाला दुसरा बाप का म्हणायचं याच उत्तर माझ्या मामाकडे पाहून मला मिळत. रांगडा गडी तो... हाडाचा शेतकरी....पण तितकाच मनानं भोळा. घरी दोन गाया आणि एक एकर जमीन एवढीच त्याची संपत्ती. पायजमा, कोपरी अन डोक्यावर मळलेली गांधी टोपी असा त्याचा पेहरावं.. मामी मात्र त्याच्या एकदम विरुद्ध स्वभावाची पण मामाची साथ तिने कधी सोडली नाही. लहान असताना आईच्या हातचा मार खावा हे भाग्य माझ्या नशिबी आलं नाही परंतु मामीने मात्र आईची कसूर भरून काढली. लई मारायची पण प्रेमही तेवढंच करायची. आजही मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही. 

माझ्या मामाला दोन मुली. तस मामाला मुलगी असणे हे भाग्याचं लक्षण आणि त्या बाबतीत मी फारच उजवा होतो. एकीच नाव सुमन तर दुसरीच स्नेहा. अभ्यासात एकदम 'सुपर' दर्जा असल्याने सुमीची शाळा जरा लवकरच सुटली होती. ती घरात मामीला आणि रानात मामा मदत करत असे आणि स्नेहा....आहाहा... काय वर्णावी तिची महती...!!!!

देवाची जी मॅनुफॅक्चरिंग सिस्टीम असेल तीच पहिलं प्रोडक्ट म्हणजे स्नेहा आणि त्याच सिस्टिमला जेव्हा  मार्चचा कोटा पूर्ण करायचं फर्मान निघालं असेल तेव्हा कसलीही प्रकिया न करता निर्माण झालेलं एक विचित्र प्रकरण म्हणजे आम्ही. स्वतःची ही अशी ओळख करून द्यायला आम्हाला कसलीही लाज वैगेरे वाटत नाही कारण देव सुद्धा काळा आहे या एकाच आशेवर आम्ही जगत आहोत आणि पुढेही जगण्याचा मानस आहे.
अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ती कधी नव्वदीच्या खाली आली नाही आणि आम्ही कधी साठीच्या वर गेलो नाही. आणि ह्या मुळे मी स्वतःला तिच्या पेक्षा तरुण समजत असे. हलाकी हम उनसे दो बरस बडे हैं ।  तरी सुद्धा आम्ही एकाच वर्गात आहोत. आता याच कारण आम्ही आपणास सांगणार नाही. त्या बाबतीत आपण सुज्ञ आहातच....!

वर्गात सर्वात हुशार असल्याने  स्नेहा सर्व शिक्षकांची लाडकी होती. त्यातून बारावीचं वर्ष असल्याने शिक्षकांच्या सुद्धा स्नेहाकडून खूप अपेक्षा होत्या. तिने आपल्या कॉलेजच नाव राज्यात काढावं अशी अपेक्षा शिक्षकांची होती. स्नेहा सुद्धा मन लावून अभ्यास करायची आणि तिनेही कुठेतरी मनाशी हे ठरवलं होतं की आपण राज्यात पाहिलं यायचंच..!

नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेचा निकाल आम्हाला सांगण्यात आला होता. निकालात विशेष काही नावीन्य नव्हतं. नेहमी प्रमाणे आणि प्रथेप्रमाणे याही वेळी स्नेहा वर्गात प्रथम आली होती. माझा कितवा नंबर आला आहे हे पाहण्याचं माझं धारिष्ट्य नव्हतं. मला तो कुणी सांगितला ही नाही आणि तो मी कुणाला विचारला ही नाही. या सगळ्यात एक गोष्ट मात्र माझ्या साठी नवीन होती, ती म्हणजे ह्या वेळी मी सर्व विषयांत पास झालो होतो...., अगदी इंग्रजीत सुद्धा..!! त्या मुळे मी भलताच खुश होतो.

कॉलेज सुटल्यावर मी माझ्या सायकली पाशी येऊन स्नेहाची वाट पाहत उभा होतो. नित्या त्याची सायकल घेऊन माझ्या पाशी आला. (नित्या.... याला ही माझ्याच प्रमाणे बारावीचा दोन वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे आम्ही एकमेकांचे जिगरी दोस्त होतो.  दिसणं, वागणं,बोलणं, हुशार असणं किंवा नसणंही या सर्वच बाबतीत असलेला एकसारखेपणा हा आमच्या मैत्रीचा मूळ आधार होता.)

"सम्या.... मग आज खुश का...? " नित्या माझ्या पाठीवर शाबासकी वजा धपाटा टाकत बोलला.

मी मोठ्या तोऱ्यात म्हणालो," विषये का भावा... ह्या वेळी बारावी सुटणार बग आपली.."

"आर पण मला एक कळाना... तू इंग्रजीत पण कसकाय पास झाला..?" नित्या स्वतःच्या विवेकबुद्धीला ताण देऊन माझा ताण वाढवू पाहत होता. मी त्याला उत्तर देणार तेवढ्यात मागून आवाज आला,

"कॉप्या केल्या असतील..." ती स्नेहा होती.

"कॉप्या बीप्या काय नाय बरका...." मी माझी बाजू सावरत बोललो.

"मग...?" एक हात कमरेवर ठेवत, एक भुवई उडवत आणि रोखून माझ्याकडं पाहत स्नेहा बोलली. तीच्या तस पाहण्याने माझी गाळण उडाली. तपमम करत मी बोललो,

"हा....म्हणजे....त्या पुनीनी थोडं दाखवलं मला...."

"हा अस खर बोलायच..." स्नेहा मला चापट मारत बोलली.

"बर ते जाऊद्या... चला घरी "
मधेच नित्या बोलला. आम्ही सायकली घेतल्या. सायकल वर बसणार एवढ्यात स्नेहा ओरडली...,

"सम्या...माझी सायकल पंक्चर झाली...."

"च्यायला.... आता.." नित्या बोलला.

"आता काय तवा..पमचर काढायला लागल..चला." मी कपाळावर आठ्या आणत नित्याकडे पाहत बोललो.

स्नेहाची सायकल घेऊन कॉलेजच्या जवळ असलेल्या पंक्चरच्या दुकानात गेलो पण दुकान बंद असल्याने शेजारच्यांना सांगून सायकल तिथेच ठेवून आम्ही मार्गावर आलो. 4-5 किलोमीटर पायपीट करत घरी जाणे शक्य नव्हतं म्हणून मी नित्याला बोललो,

"नित्या... माझ्या सायकला कॅरेज नाही त्यामुळे तुझी सायकल मला दे मी आणि स्नेहा घरी जातो तू माझी सायकल घेऊन जा...."

"दिली असती बारका सम्या.... पण तात्यानी पेंडीचं प्वातं घेऊन यायला सांगितलय...त्यामुळं नाय ना जमायचं.." नित्या एवढंच बोलला आणि निघूनच गेला.

आता मी आणि स्नेहाच होतो. मी तिच्याकडे पाहिलं .ती माझ्याकडे रागाने पाहत होती. दातओठ खात ती बोलली, "तुझ्या सायकलला कॅरेज का नाही.." आणि पाय आपटत पटापट चालू लागली. मी सायकल ढकलत तिच्या मागे गेलो आणि तिला   समजुतीच्या स्वरात म्हणालो,
"हे बग स्नेहा....तू काळजी नको करू,आपण दोघे पायपाय घरी जाऊ.." 

"मला पायपाय घरी जायचं नाही....आणि तसही माझे पाय लई दुखत्यात.." तिचा रागाचा पारा काही केल्या उतरत नव्हता. त्यामुळे माझही  टेम्प्रेचर जरा वाढलं आणि मी बोलून गेलो,

"आता कॅरेज नाही तर काय पुढं नळीवर बस्ती का..?"

आणि ती चक्क 'हो' म्हणाली. का कुणास ठाऊक पण मला ते खूप आवडलं. त्यानिमित्ताने स्नेहा पहिल्यांदा माझ्या इतक्या जवळ येणार होती म्हणून माझी कदाचित अशी भावना झालेली असावी. कारण काहीही असलं तरी तीच 'हो' म्हणणं मला खूपच आवडलं होतं. 
मी ही जास्त आढेवेढे न घेता तिला म्हणालो,

"चल मग...आणि नीट बस.." माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एका क्षणात आता रंग भरायला सुरुवात झाली होती. मी होकार देताच स्नेहा माझ्या जवळ आली. सायकल तिने तिच्या हातात घेतली. मी तिच्याकडे पाहतच होतो. तिने मला सायकल पकडण्याचा इशारा केला. मी भानावर आलो. सायकल पकडली. स्नेहा अलगदपणे सायकलीच्या पुढ्यात बसली. मी पॅडल मारलं तस तिने स्वतःला जरा जास्तच आवळून घेतलं. माझ्या हाताला तिच्या हाताचा स्पर्श होत होता. तिने हँडल घट्ट पकडल्यामुळे मला सायकल चालवणं जरा अवघड जात होतं पण मला त्याच भान नव्हतं. मी तशीच कशीबशी सायकल चालवत होतो. तिचे काळेभोर केस माझ्या गालावर येऊन मला गुदगुदल्या करत होते. एका वेगळ्याच दुनियेत मी गेलो होतो. त्याच धुंदीत असताना सायकल खाडकन एका खड्ड्यात आदळली. मी भानावर आलो आणि स्नेहा माझ्यावर खेकसत बोलली,

"सम्या...खड्डे बीड्डे बग ना जारा, बावळाटा... मला पाडच तू मग तुला बघते.."  खड्ड्यामुळे नाही तर स्नेहाच्या ह्या खेकसण्या मुळे मी भानावर आलो आणि मी तिला सायकल चालवता चालवता म्हणालो,

"मी सायकल नीटच चालवतोय..  तुझी ती केस सांभाळ, ती माझ्या डोळ्यात जात्यात त्यामुळं मला काय समजत नाय..."  

तिने तिचे केस एका हाताने पुढे घेतले आणि मी पुरता भुलून गेलो. तिच्या मानेवरचा तो तिळ..... अहाहा...... 
सावळ्या त्वचेवर तो काळा तीळ फारच उठून दिसत होता. त्या तिळाच्या खोलात मी पुरता भुलून गेलो होतो.  इतका भुलून गेलो की आता मात्र मला तंद्रीच लागली होती.  मी एकटक त्या तिळाकडे पाहत होतो. त्याच आभासी जगतात हिंडत असतात भला मोठा आवाज झाला... आता सायकल खड्ड्यात आदळून पलटी झाली होती. स्नेहा कुठच्या कुठं पडली होती. मी मात्र दोन कोलांटउड्या घेऊन चारीत उताणा पडलो होतो.  अंग ठणकत होतं. त्याच परिस्थितीत मी कसाबसा उठलो आणि स्नेहाला पाहू लागलो तर ही मॅडम तरातरा  पुढं चालली होती. तिला जाताना पाहून मी सायकल उचलली आणि तिच्या मागे धावू लागली, तिला विनवणी करू लागलो पण ती ऐकायच्या मूड मध्ये नव्हती. तिचा रागाचा पारा जसजसा वाढत होता तसतशी मामी मला हातात खोऱ्याच दांडक घेऊन उभी असलेली दुर्गा वाटत होती.

त्यानंतर घरी गेल्यावर माझा अपेक्षाभंग वैगेरे काही झाला नाही. दुर्गा माता मला प्रसन्न झाली आणि तिने तीच भागत नाही तोपर्यंत मला प्रसाद दिला. तिच्या प्रसादाचा साईड इफेक्ट मला पुढच्या आठवडा भर जाणवत होता.

......

रविवारचा दिवस होता. सकाळ सकाळ मामा जरा जास्तच खुश वाटत होता. तो सुमीची जरा जास्तच काळजी घेत होता. मामीनी भाकरी थापता थापता त्याला विचारलं ,

"काय हो , काय झालं आज , सुमीची जरा जास्तच काळजी घेताय..."

"अग सुमीची आय.... बातमीच तशी हाय..." मामा सुमिकडे पाहत म्हणाला. सुमीने पाण्याचा हंडा मोरीवर ठेवला आणि हात पुसत पुसत मामाच्या जवळ येऊन बोलली,

" कसली बातमी नाना...?"

सुमीला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत मामीकडे पाहत मामा प्रेमाने बोलला,

"लईच... मोठं झालं ना ग आपलं बाळ... माझ्या अंगा खांद्यावर खेळलं, रडलं , हसलं.... आणि आज ते निघून जाणार.... खरंच लईच मोठं झालं ना ग आपलं बाळ..."

मामाच्या बोलण्याचा मला अंदाज आला आणि मी मध्येच मोठ्याने म्हणालो,
"आयला...मामा.... नवरा पगीतला की काय सुमीला..?"

मामाने सुमिकडे पाहतच होकार दिला. त्याच्या डोळ्यात टचकन अश्रू तरळले. सुमी मामाला बिलगली.  माझ्याही डोळ्यात कधी पाणी आलं माझं मलाच समजलं नाही. बराच वेळ वातावरण तंग राहिलं. सुमीला सावरत मामा म्हणाला,

"रडतीस काय सुमे... एक ना एक दिवस हे होणारच होतं आणि हा आनंदाचा क्षण हाय... तुला स्थळ आलाय ते पण काय साधं सुध नाय....वाड्याच्या सरपंचाच्या पोराचं स्थळ हाय..."

आता मात्र सुमी लाजली आणि बाहेर पळून गेली. या सगळ्या वातावरणात घरातला अभ्यासू किडा थोडा दूर बसून अभ्यास करत होता. तिची थोडीशी 'घेऊ' या इराद्याने मी मामाला म्हणालो,

"काय मामा... सुमीचं ठरलं आता ह्या मॅडमच पण पगा...."

माझ्या डोक्यात टपली हाणत मामा बोलला,

"तिच्या लग्नाची काय घाई नाय... शिकू दे तिला... हुशार हाय ती... डाक्टर झाल्यावरच तीच लग्न करत असतोय म्या..." 

मामाच्या ह्या बोलण्याने मला मात्र एका गोष्टीचा आनंद झाला तो म्हणजे मामाला स्नेहाच्या लग्नाची घाई नाही. तोच आनंद माझ्या काळजात साठवत मी सुमीच्या लग्नाच्या तयारीला लागलो.

........

जेवून सर्व जण झोपी गेलो. मला मात्र झोप लागत नव्हती. लग्न सुमीचं होतं पण मला माझ्या आणि स्नेहाच्या लग्नाचं सपान पडत होतं. त्याच वेळी मला कोणीतरी कुजबुजत असल्याचं जाणवलं. मी नीट कान देऊन ऐकू लागलो. मामा आणि मामी काहीतरी बोलत होते. मी नीट ध्यान देऊन ऐकल. मला धक्का बसला. सुमीच्या लग्नासाठी मामाने राहिलेली एक एकर जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. ज्या काळ्या आईने मामाला जगवलं, आम्हाला मोठं केलं. तीच काळी आई स्वतःचा बाजार मांडून सुमीच लग्न लावून देणार होती.
काळजावर दगड ठेवून मामा मामीने हा निर्णय घेतला होता. स्नेहाला, सुमीला आणि मला ह्यातलं काही कळणार नाही अशी खबरदारी घ्यायची अस ही त्यांनी ठरवलं होतं. दुर्दैवाने म्हणा नाहीतर सुदैवाने म्हणा मला मात्र हे समजलं होतं.
एखादी गोष्ट माहीत असूनही ती माहीत नाही असं दाखवून जेव्हा जगावं लागत तेव्हा ते जगणं हे मरणा पेक्षा कमी नसत. मी मात्र ते दुःख घेऊन जगत होतो. अस वाटत होतं की मामा साठी काहीतरी करावं. पण माझ्यात तीही ताकद नव्हती. मला माझाच राग येत होता. बापापेक्षा ज्या माणसाने आणि आई पेक्षा ही ज्या बाईने माझ्यावर अतोनात प्रेम केलं होतं ती दोन माणसं आज दुःखाच्या खाईत होती आणि तरीही हसत होती...फक्त आमच्या साठी, आमच्या भल्यासाठी....

तेव्हा पासून मी ही माझं आयुष्य सिरीयसली घ्यायला लागलो. मामाच्या बरोबरीने काम करू लागलो. जमेल तसा अभ्यास करू लागलो. पण इकडे स्नेहाचं वागणं बदलत चाललं होतं. ती आता अभ्यास करत नव्हती. मामीला मदत करण्यात स्वतःला गुंतवत होती.  तिच्यातला बदल मला जाणवत होता. सुमी जाणार आणि त्या नंतर कामाची सर्व जबाबदारी मामीवर यायला नको म्हणून स्नेहा अशी वागत असावी असच मला वाटत होतं. पण तेही कारण फोल ठरलं. कारण कितीही काही झालं तरी स्नेहा अभ्यास कधी सोडणार नाही याची मला खात्री होती. 

कॉलेज वरून आल्या नंतर मामीने आम्हाला गाया घेऊन माळावर जायला सांगितलं. गाया चारायला कायम नाही म्हणणारी स्नेहा आज एका पायावर तयार झाली होती. तीच हे वागणं मला आता अधिक खटकू लागलं होतं पण मी गपगुमान तिच्या माग गाया घेऊन गेलो. माळावर गेल्यावर बऱ्याच वेळानं मी स्नेहाला म्हणालो,

"स्नेहा...काय झालंय का...?"

ती बारीक काडीने माती टवकारात मला म्हणाली, "नाही रे.."

"मग तू अभ्यास का करत नाहीस..." मी.

"ताईच लग्न आलंय ना म्हणून...." ती.

"मला हे कारण काही पटत नाही." मी.

"तुला पटो अगर ना पटो...हेच कारण खरं आहे.." स्नेहा उगाच स्मित करत बोलली.

"अशीच वागत राहिलीस तर डॉक्टर कधी होणार तू...? ते स्वप्न फक्त तुझं नाही तुझ्या बापाचं सुद्धा आहे हे लक्षात आहे ना तुझ्या..?" मी अस म्हणताच स्नेहाच्या डोळ्यात आसवं दाटून आली.

मोठ्या हिमतीने ती आसवं तशीच गिळून टाकत स्नेहा बोलली,

"तो तुझ्याही बाप आहे, ती स्वप्न तू पुर्ण कर..." येवढं बोलून स्नेहाच्या आसवांचा कडेलोट झाला. सह्यकड्यावरून भिमाई धपाधप खाली कोसाळावी तसे तिचे दोन्ही डोळे वाहू लागले. मी काही बोलणार इतक्यात त्या वाहणाऱ्या डोळ्यांना आपल्याच हाताने बांध घालत ती मागे फिरली...आणि वाऱ्याच्या वेगाने घराकडे पळत सुटली. गाया तशाच सोडून मी ही तिच्या मागे पळत सुटलो.

स्नेहा घरात येऊन थेट मामीला बिलगली. रड रड रडली आणि तशीच मामीच्या कुशीत झोपून गेली. मामीने तिला एका बाजूला सारून तिला नीट झोपवलं. तोपर्यंत रात्र झाली होती. स्नेहा उपाशी झोपल्याने त्या रात्री मला ही जेवण गेलं नाही. मामी सिरस्त्याप्रमाणे उपाशी झोपली.
मी रात्रभर स्नेहाच्या त्या शब्दांचा विचार करत होतो. ती का मला मामाची स्वप्न पूर्ण करायला सांगत होती. अशी कोणती कारण असावी. माझ्या डोक्याचा भुगा झाला होता. स्नेहाच बोललं माझ्या समजण्या पलीकडचं होऊन बसलं होतं. रात्रभर झोप लागली नाही..... आणि दुसऱ्या दिवशी झोप कायमची उडाली.............

सकाळचे 6 वाजले होते.
नेहमी प्रमाणे मामीची चूल पेटली होती. सुमी घरात पाणी भरत होती. मामाने बाहेरून आरोळी ठोकली,

"सम्या उठ..धारा काढायच्यात..."

मी उठलो...बादली घेतली आणि गोठ्यात गेलो आणि माझ्या पाया खालची जमीनच सरकली. हातातली बादली खाली पडली. प्रचंड आवाज झाला. मी घुडग्यावर दाणकन आदळलो. बदलीचा आवाज ऐकून मामा पळतच गोठ्यात आला. मला खाली पडलेलं पाहून माझ्या जवळ आला आणि मला विचारू लागला, काय झालं....? मी घाबरल्या नजरेने मामाकडे पाहत... गोठ्यातल्या कोपऱ्याकडे हात केला.....

स्नेहा निचपीत पडली होती. तोंडावाटे फेस येत होता आणि शेजारी कीटकनाशकाची बाटली मंदगतीने हालत होती.
स्नेहाला पाहताच मामाने मोठ्याने हंबरडा फोडला. काळीज चिरून टाकणारी ती आरोळी माझं काळीज पार पिळवटून गेली. घरातून मामी आणि सुमी पळतच आल्या. स्नेहाचा थंडगार पडलेला देह पाहून मामीची वाचाच बसली. सुमीला काही कळत नव्हतं. मेलेल्या बहिणीच्या छाताडावर हाणून तिला जाग करावं का स्वतःच्या आईच्या कंठात  अडकलेला हुंदका बाहेर काढावा हेच सुमीला कळत नव्हतं. आये..रड....आये रड.... अस म्हणता म्हणता तीच मोठ्या मोठ्या ने रडत होती. मी मात्र स्नेहाच्या त्या निर्जीव देहाकडे एकटक पाहत होतो. तो देह मला सांगत होता स्नेहाच्या त्या शेवटच्या शब्दांचा अर्थ.... मला तो अर्थ टोचत होता. मला तो तेव्हाच का नाही समजला म्हणून तो अर्थ मला कोसत होता.
मला अपराधी पणाची जाणीव करून देत होता.

स्नेहाच्या दुसऱ्या हातात मला एक कागद घट्ट पकडलेला  दिसला. तो कागद दिसताच मी भानावर आलो. तिच्या त्या निर्जीव हातातून तो कागद मी अलगद ताब्यात घेतला. स्नेहाचे शेवटचे शब्द त्यावर उमटले होते........,

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रिय आई-नाना,

मी जातेय....मला माफ करा..नाना.  मुली ह्या बापाच्या डोक्यावरच ओझचं असतात. ताईच्या लग्नासाठी तुम्ही आपली जमीन विकायला काढली. त्या रात्री मी जागी होते जेव्हा तुम्ही हे आईला सांगत होतात.
आमच्या साठी तुम्ही जिला आमच्या पेक्षाही अधिक जीव लावला ती जमीन विकणार ह्या विचारानेच कित्तेक राती मी जागून काढल्या. आज ताईच्या लग्नासाठी तुम्ही हे करता आहात उद्या माझं शिक्षण आहे, माझं लग्न आहे, तेव्हा काय करणार आहात नाना तुम्ही.....? नाही ना उत्तर.... मला माहित आहे तुमच्या कडे या प्रश्नाला उत्तर नाही. म्हणून तुमचा हा प्रश्नच मी पुसून टाकायचं ठरवलं. माझ्या जाण्याने तुम्हाला यातलं काहीही करावं लागणार नाही. ताईच लग्न होईल ती सुखी होईल. समीर आहे तुमची काळजी घ्यायला. मला त्याला सुद्धा सॉरी म्हणायचं आहे. त्याला कायम मी त्रास देत आले. पण तो कायम माझी काळजी घेत असायचा.

आज हा निर्णय घेत असताना माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं आहे.
सगळेच म्हणतात मुलींनी शिकायला हवं तर मग शिक्षणाचा खर्च इतका मोठा का..?
सगळेच म्हणतात शेतकरी जगला पाहिजे तर मग त्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमीन विकायला का लागत आहे..?
लग्न म्हणजे दोन जीवांच मिलन मग त्यासाठी एवढा मोठा खर्च का करायचा...?
असे एक नाय अनेक प्रश्न आहेत. पण याची उत्तर नाहीत. आणि जर का ह्या प्रश्नांची उत्तरं मी शोधत बसले असते तर आज मी घेतलेला निर्णय कदाचित पुढे जाऊन माझ्या बापानं घेतला असता.
आज मी जो काही निर्णय घेत आहे याचा विचार करावा लागेल, आपल्या समाजाला, सामाजिक व्यवस्थेला आणि पर्यायाने आपल्या सरकारला.
मी कुणालाही दोष देत नाहीये. परंतु आज मी घेतलेला निर्णय उद्या कोण्या मुलीला घ्यायला लागू नये एवढीच तळमळ..!

आई-नाना काळजी घ्या. जातेय मी...खूप दूर...जिथून पुन्हा कधीच येणार नाही..........

तुमची लाडकी लेक,
स्नेहा..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्नेहाच शेवटचं पत्र वाचून तिला दोष द्यावा का तीच कौतुक करावं, हेच मला कळेना. स्नेहा तू एकदा माझ्याशी बोलायच होतं ग... मला ही तुला सांगायचं होतं की त्या रात्री मीही जागा होतो. मामाचा निर्णय मलाही माहीत होता. आपण दोघांनी त्यावर उत्तर शोधलं असतं...... आपण दोघानी मामाच स्वप्न पूर्ण केलं असत. पण ते सगळं माझ्यावर टाकून तू एकटीच निघून गेली...

पण त्या कशालाच आता अर्थ उरला नव्हता.स्नेहा गेली होती. पण जाता जाता माझा मरणाचा हक्क घेऊन गेली होती. आता माझं जीवन माझं राहील नव्हतं ते स्नेहाचं झालं होतं.
तिने मोठ्या विश्वासाने त्या पत्रात  मामा मामीला उद्देशून एक ओळ लिहिली होती.. 'समीर आहे तुमची काळजी घ्यायला.' तिचा तो विश्वास मला खरा ठरवायचा होता. मामा मामी साठी मला जगायचं होतं. त्यांना जगवायचं होतं.
मी माझे डोळे पुसले. स्नेहाचं पत्र वरच्या खिशात काळजा जवळ ठेवलं. उठलो....मामी जवळ गेलो. तिचा हात हातात घेतला . माझा स्पर्श होताच इतका वेळ गपगार आणि स्तब्ध झालेली मामी मला बिलगली आणि तिने एकच टाहो फोडला......

तिच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता मी स्नेहाकडे पाहत होतो, ती एकदम शांत होती पण मी मात्र पेटून उठलो होतो...!!

समाप्त

#सत्यशामबंधू


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

उदाहरणार्थ कोसला वगैरे....