विकृत मनोवृत्ती आणि हिंदू महासभा

"जे खलांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भुतास्परस्परे पडो । मैत्रजीवांचे ।। "
--------------------------------------------- संत ज्ञानेश्वर
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज वरील ओवीतून जगाच्या निर्मिकाकडे मागणे मागतात की, ' हे देवा, जे खलप्रवृत्तीचे आहेत त्याचं खलत्व जाऊन, त्यांच्यातील सत्कर्म करण्याची वृत्ती वाढीस लागु दे आणि संपूर्ण जीवांमध्ये मैत्रीची भावना जागृत होउदे."
वरील ओवीचा आमच्या ज्ञाना प्रमाणे तरी असाच अर्थ होतो. आता प्रश्न असा आहे की, हे आम्ही आत्ताच का सांगत आहोत. तर त्याला कारण आहे.  अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात एका उच्च विध्याविभूषित महिलेने  महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडून त्यांची त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी  प्रतिकात्मक रित्या हत्या केली. ही महिला महासभेची राष्ट्रीय सचिव असल्याचं सांगितलं जातं.  आता या विकृत मानसिकतेच्या लोकांनी केलेल्या या विकृत घटनेचा संत ज्ञानेश्वरांच्या ओवीशी काय संबंध...
त्याच कारण अस की, आम्ही त्या लोकांसाठी ही देवाकडे हीच प्रार्थना मागत आहोत की त्यांचं खलत्व जाणून ते सन्मार्गाला लागो परंतु तस होताना दिसत नाही.
गांधी यांना किती समजले मला माहित नाही. विरोध असू शकतो, तो असावाच लागतो परंतु विरोध हा व्यक्तीला असावा की त्याच्या विचारांना हा कळीचा मुद्दा आहे.  विचारांची लढाई ही फक्त विचारांशी हवी अस आम्हाला वाटत. गांधींना विरोध करताना त्याचे सरकार, शासन, धोरण, शेती, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था , धर्म आणि इतर बाबतीतील विचार जर  आपल्याला पटत नसतील तर आपला स्वतंत्र विचार मांडून तो लोकांपर्यंत घेऊन जायला हवं.  आणि तो विचार लोकांना पटवून द्यायला हवा.
दुसऱ्याची बदनामी करून आपल्याला मोठं होता येत नसत.  आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसायची नसते. असा करणारा स्वतः कोत्या मनोवृत्ती चा असतो आणि त्याचा त्याच्या विचारांवर विश्वास ही नसतो.
काहीशी हीच स्थिती स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणाऱ्या तथाकाथित कर्मठ आणि दुबळ्याबुद्धीच्या लोकांची झालेली आहे. आम्ही फार विचाराने पंडित आहोत असं आमचं म्हणणं नाही परंतु कोण्या एका खुन्याची तरफदारी करावी इतकेही आम्ही दुधखुळे नाही. 
भारत हा कायम शांततेचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. गौतमबुद्ध यांच्यापासून ज्ञानेश्वरांपर्यंत आणि पुढे गांधींच्या पर्यंत अविरत पणे सुरू असलेली ही शांततेची चळवळ ब्राह्ममांडात चंद्र सूर्य असे पर्यंत सुरू राहील. तिला लगाम घालण्याचा प्रयत्न कितीही केला तरी थांबणार नाही.
मुळातच हिंदू धर्म हा सहिष्णू आणि शांतता प्रिय धर्म आहे. अस असताना गांधींच्या पुतळ्याला गोळया घालून कुठल्या पद्धतीने ते हिंदू धर्माचे रक्षण करणार आहेत हेच कळत नाही.
त्यांच्या पाठीमागे जाणाऱ्या तरुण पिढीची म्हणूनच आम्हास काळजी वाटते. भरतापुढे आज अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी अशा संघटना किती योगदान देतात हा खरा संशोधनाचा विषय आहे. 
जाता जाता एक सांगेन, समाजात भेद निर्माण करणाऱ्या या असल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना अखिल हिंदू आणि हिंद समुदायाने उखडून फेकून द्यायला हवं...!!
अर्थात, त्यांचे विचार फेकून द्यायला हवे असच आम्हाला म्हणायचंय कारण आम्ही ज्ञानेश्वर महाराजाचे भक्त आहोत, व्यक्ती फेकून द्यायची भाषा आम्ही कधीच करणार नाही..!
धन्यवाद
#सत्यशामबंधु

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी